हिवाळा हा ताज्या भाज्यांचा आणि पोषक आहाराचा ऋतू आहे. थंड वातावरणात शरीराला उष्णता आणि ताकद देणारे पदार्थ खाणे आवश्यक असते. अशा वेळी बाजारात मिळणाऱ्या हंगामी भाज्यांमध्ये अनेक प्रकार असतात. (3 vegetables you must eat in winter, they provide warmth and nutrition to the body)त्यातील तीन भाज्या सगळ्याच्या आवडीच्या आणि फारच पौष्टिक असतात. ज्या लहान मुलेही आवडीने खातात. गाजर, मटार आणि मेथी या तीन भाज्या विशेष लोकप्रिय आणि आरोग्यदायी मानल्या जातात. या भाज्या शरीराला आवश्यक पोषण देतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
गाजर ही भाजी जीवनसत्त्व 'ए'चा उत्कृष्ट स्त्रोत आहे. त्यात बीटा-कॅरोटीन मोठ्या प्रमाणात असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि त्वचेच्या तजेलपणासाठी उपयुक्त आहे. गाजरात फायबर, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्सही असतात, जे पचन सुधारतात आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात. गाजराचे विविध पदार्थ करता येतात. गाजर हलवा, गाजराची भाजी, गाजराचे सूप किंवा गाजराची कोशिंबीर असे अनेक स्वादिष्ट पदार्थ करता येतात.
मटार म्हणजे थंडीत मिळणारा पौष्टिक खजिना. त्यात प्रोटीन, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात. मटार शरीराला ऊर्जा देते आणि हाडे मजबूत ठेवते. हिवाळ्यात गरमागरम मटार पुलाव, मटार पनीर किंवा आलू- मटारची भाजी करता येते. थंडीत मटार फारच चविष्ट मिळतात. तसेच मटार करंजी आणि मटार पराठाही केला जातो. चवीला मस्त असतो.
मेथी ही हिवाळ्यातील आरोग्यवर्धक पालेभाजी आहे. तिच्यात लोह, कॅल्शियम, फायबर आणि जीवनसत्त्व के मोठ्या प्रमाणात असतात. मेथी रक्तशुद्ध करते, पचन सुधारते आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. मेथी पराठा, मेथीची पातळ भाजी किंवा मेथी डाळ हे काही सहज करता येणारे असे पौष्टिक पर्याय आहेत.
या तिन्ही भाज्या थंडीत शरीराला आवश्यक उब देतात आणि सर्दी-खोकल्यापासून संरक्षण करतात. त्यामुळे हिवाळ्यात रोजच्या आहारात या भाज्यांचा समावेश करणे अत्यंत फायद्याचे ठरते. या भाज्या केवळ चवीत भर घालत नाहीत, तर शरीराला आतून मजबूत ठेवतात तसेच सगळे आवडीने खातात.
