वृक्षवल्ली आम्हा सोयरे... लॉकडाऊन काळात कृषी विद्यापीठाने केली १३ लाख रोपांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 09:27 IST2021-06-30T04:20:28+5:302021-06-30T09:27:02+5:30

दापाेली : लॉकडाऊन काळातही दापोली कोकण कृषी विद्यापीठाने यंदा सुमारे १३ लाख कलम रोपांची विक्रमी विक्री केली आहे. ही ...

Agriculture University sells 13 lakh rupees | वृक्षवल्ली आम्हा सोयरे... लॉकडाऊन काळात कृषी विद्यापीठाने केली १३ लाख रोपांची विक्री

वृक्षवल्ली आम्हा सोयरे... लॉकडाऊन काळात कृषी विद्यापीठाने केली १३ लाख रोपांची विक्री

दापाेली : लॉकडाऊन काळातही दापोली कोकण कृषी विद्यापीठाने यंदा सुमारे १३ लाख कलम रोपांची विक्रमी विक्री केली आहे. ही सर्व रोपे शेतकऱ्यांनी १५ जूनपूर्वीच उचलली असून, त्यातून कोकण कृषी विद्यापीठाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची भर पडली आहे.

दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, जांभूळ, मसाला पिके यासारख्या कलमांच्या रोपांची विक्रमी विक्री झाली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी एक महिना आधीच कोकण कृषी विद्यापीठातील सर्वच नर्सरीतील कलम रोपे संपली आहेत़ यावर्षी विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे कलमे रोपे विकली आहेत़

राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कलम रोपांची उचल केली आहे. त्यामुळे जूनपूर्वीच विद्यापीठातील पालघर ते सिंधुदुर्ग या सर्वच जिल्ह्यातील कृषी विद्यापीठाच्या नर्सरीतील कलम रोपे संपली आहेत. यावर्षी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता कृषी विद्यापीठाने रोपांची निर्मिती वाढवण्याचा निर्णय घेतला असून, यावर्षी पंधरा लाख रुपये तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाची शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता त्या त्या रोपांची निर्मिती वाढवण्यात येणार असल्याचे दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर यांनी सांगितले

कृषी विद्यापीठातील खास कलम रोपे उचलण्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नगर, पुणे या जिल्ह्यातील शेतकरी येत आहेत. हापूस, केशर, रत्ना या आंब्याच्या कलम रोपांची मोठ्या प्रमाणात विक्री करीत आहेत. तसेच यावर्षी शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नारळ रोपांची सुद्धा मोठ्या प्रमाणात उचल हाेत आहे. तसेच कृषी विद्यापीठाच्या बाहडोली या जांभळाच्या रोपांचीसुद्धा मोठ्या प्रमाणात उचल केली आहे.

------------------

दापोली कोकण कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांची विश्‍वासार्हता जपली असून, योग्य दरात चांगली दर्जेदार कलम रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यशस्वी झाले आहे. त्यामुळेच राज्यातील विविध भागांतील शेतकरी कृषी विद्यापीठातील रोपांची उचल करीत आहेत.

- डॉ. पराग हळदणकर, संशोधन संचालक

------------------------

दापोली कोकण कृषी विद्यापीठातील हापूस आंब्याच्या कलम रोपांप्रमाणेच केशर, रत्ना, आंब्याच्या रोपांची मोठ्या प्रमाणात उचल घाटमाथ्यावरील शेतकरी करीत आहेत. यावर्षी कृषी विद्यापीठाने टी. दी. नारळ, बाणवली नारळ, बहाडाेली जांभूळची विक्रमी उचल शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे पुढीलवर्षी या सर्व कलम रोपांची निर्मिती वाढविण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. शेतकऱ्यांची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने दापोली कोकण कृषी विद्यापीठाचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे.

- अरुण माने, उपसंचालक बियाणे कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.

Web Title: Agriculture University sells 13 lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.