पनवेलच्या महापौरपदासाठी नव्या-जुन्यामध्येच खरी स्पर्धा; भाजपकडून 'या' पाच नावांची चर्चा
By वैभव गायकर | Updated: January 23, 2026 11:31 IST2026-01-23T11:31:12+5:302026-01-23T11:31:45+5:30
महापौरपदासाठी काय असतील निकष? जाणून घ्या

पनवेलच्या महापौरपदासाठी नव्या-जुन्यामध्येच खरी स्पर्धा; भाजपकडून 'या' पाच नावांची चर्चा
वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: महापालिकेचे महापौरपद आरक्षण सोडतीत नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. यामुळे भाजपमधून निवडून आलेल्या ओबीसी नगरसेवकांमध्ये महापौरपदासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेत जुन्या-नव्या चेहऱ्यांचा समावेश असून त्यांच्या स्पर्धा रंगणार आहे.
महापालिकेत भाजप महायुतीचे ६० नगरसेवक निवडून आलेले आहेत. यापैकी ५५ नगरसेवक भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. यापैकी जवळपास ३५ ओबीसी चेहेरे भाजपाकडे आहेत. त्यामुळे महापौरपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे.
महापौरपदासाठी सुरुवातीपासून बिनविरोध झालेल्या ममता प्रीतम म्हात्रे आणि नितीन पाटील यांची नावे चर्चेत आहेत. पनवेल महापालिकेत शेकापच्या वतीने विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावणारे प्रीतम म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांचा प्रचंड फायदा भाजपाला झाला. याव्यतिरिक्त ठाकूर कुटुंबीयानंतर म्हात्रे परिवाराचे पनवेलमधील राजकारणातील स्थान पाहता त्यांच्या पत्नी ममता म्हात्रे यांना भाजप मानाचे स्थान देऊन म्हात्रे कुटुंबीयांच्या भाजप प्रवेशाला पोचपावती देण्याची शक्यता आहे.
याव्यतिरिक्त नितीन पाटील हेदेखील प्रशांत ठाकूर यांचे विश्वासू असल्याने त्यांचे नावदेखील चर्चेत आहे. या दोन नावांसह नगरपरिषदेपासून नगरसेवक राहिलेल्या आणि उपमहापौरपद भूषविलेल्या खांदा कॉलनीमधील सीताताई पाटील, खारघर शहरातील दुसऱ्या टर्मचे नगरसेवक ॲड. नरेश ठाकूर, तरुण चेहरा असलेल्या डॉ. अस्मिता घरत या नावांचादेखील पक्षश्रेष्ठी विचार करू शकतात.
काय असणार निकष?
नगरसेवकांमध्ये दुसऱ्या टर्ममध्ये निवडून आलेले नगरसेवक तसेच नगरपरिषद काळापासून सतत निवडून येत असलेल्या काही नगरसेवकांना महापौरपदासाठी प्राध्यान्य देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापौरपदी नेमकी कोणाची निवड होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
यांची नावे चर्चेत
१) ममता प्रीतम म्हात्रे, २) नितीन पाटील, ३) सीताताई पाटील, ४) ॲड. नरेश ठाकूर, ५) डॉ. अस्मिता घरत