करवाढ नसलेला पनवेल महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर; विकासासाठी ३,८७३ कोटींचे 'बजेट'
By वैभव गायकर | Updated: February 25, 2025 18:45 IST2025-02-25T18:44:44+5:302025-02-25T18:45:31+5:30
करवाढ नसल्याने पनवेलकरांना दिलासा

करवाढ नसलेला पनवेल महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर; विकासासाठी ३,८७३ कोटींचे 'बजेट'
वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: नवव्या वर्षात पदार्पण केलेल्या पनवेल महानगरपालिका विकासाच्या एका वेगळ्या वळणावर आहे. मालमत्ता करावरून निर्माण झालेला संभ्रमामुळे मालमत्ता कर वसुलीवर त्याचा परिणाम झाला असला तरी जीएसटी अनुदान तसेच इतर अनुदानांमुळे पालिकेची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे. सन 2024-25 चा सुधारित व सन 2025 -26 चा मूळ 3,873 कोटी 86 लाखांचा अर्थसंकल्प आयुक्त मंगेश चितळे यांनी आज सादर केला. मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे यांनी प्रशासकीय स्थायी समितीच्या बैठकीमध्ये आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्याकडे हा अर्थसंकल्प सुपूर्द केला. कोणत्याही प्रकारची करवाढ नसल्याने हा अर्थसंकल्प पनवेलकरांना दिलासा देणारा ठरला आहे.
3991 कोटी 99 लाखांचे मागील वर्षाचे अर्थसंकल्प होते. त्यात काही प्रमाणात घट झाली असून मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट्य पालिकेला गाठता आलेले नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात 1037 आरंभीची शिल्लकिचा समावेश आहे. याव्यतिरिक्त मनपा कर 1317 कोटी युडीसीपीआर व विकास शुल्क अंतर्गत वसुली 115 कोटी, अमृत वाढीव पाणीपुरवठा योजना अनुदान 248 कोटी, प्राथमिक सोयीसुविधा व नगरोत्थान अनुदान 200 कोटी, जीएसटी अनुदान 507 कोटी तसेच करेतर महसूल शास्ती व शुल्कचे 154.86 कोटींच्या जमेच्या बाजूंचा समावेश आहे. मात्र असे असले तरी पालिका क्षेत्रात सुरु असलेले मालमत्ताकराचा तिढा लक्षात घेता मनपा मालमत्ता कराचे 1800 कोटीचा कर वेळेत वसूल न झाल्यास अर्थसंकल्पाचा आकडा खाली सरकण्याची शक्यता आहे.
पालिकेच्या शेकडो कोटींच्या ठेवी जमेच्या बाजु असल्याने विशेषतः मुख्य लेखा व वित्तअधिकारी मंगेश गावडे आणि त्यांच्या टीमचे कौतुक आहे. हा अर्थसंकल्प सादर करताना आयुक्त मंगेश चितळे यांनी पनवेल महानगरपालिकेचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षीचा अर्थसंकल्प आरोग्यावर भर देणारा होता. त्यादृष्टीने या अर्थसंकल्पात वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, 450 बेडचे हिरकणी हॉस्पिटल, कळंबोली मधील होल्डिंग पॉण्डचा विकास, गाढी नदीवर पनवेल शहरालगत पूर प्रतिबंधात्मक बंधारा बांधणे, 35 दैनिक बाजारांचे विकास, तारांगण बांधणे आदी महत्वाच्या कामांचे अंतर्भाव करण्यात आले आहे.
कोणत्याही प्रकारची कर वाढ नसलेला उत्पन्न वाढीवर भर देणारा गतिमान प्रशासनासाठी उपाययोजना करणारा, सर्वांगीण विकासासाठी नव्या शैक्षणिक संकल्पनांचा प्रभावी वापर करणारा असा हा अर्थसंकल्प आहे.भविष्याचा दुरगामी विचार करुन नव्या जलस्रोतांचा शोध घेणारा, शहर स्वच्छ करण्यासाठी लोकसहभागावर भर देणारा पर्यावरण संरक्षण व संवर्धन करणारा हा अर्थसंकल्प पनवेलकरासाठी सादर करण्यात आला आहे.
- मंगेश चितळे (आयुक्त,पनवेल महानगरपालिका)