ग्लोबिकाँन टर्मिनलची दुषित पाणी खाडीत सोडण्याची मनमानी सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 20:53 IST2023-06-24T20:52:21+5:302023-06-24T20:53:05+5:30

उरण तालुक्यातील खोपटे-बांपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत ग्लोबिकाँन  इंटरनँशल कार्गो टर्मिनल प्रा.लि. या कंपनीतील आयात-निर्यात मालाची हाताळणी केली जाते.

Globicon Terminal's arbitrary release of polluted water into the bay continues in uran | ग्लोबिकाँन टर्मिनलची दुषित पाणी खाडीत सोडण्याची मनमानी सुरुच

ग्लोबिकाँन टर्मिनलची दुषित पाणी खाडीत सोडण्याची मनमानी सुरुच

मधुकर ठाकूर

उरण : बांधपाडा, पिरकोन, कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीतील ग्लोबिकाँन टर्मिनलमधील दुषित पाणी  पहिल्या पडलेल्या पावसात शनिवारी खाडीच्या पात्रात सोडल्याने शेतकरी, मच्छीमार संतप्त झाले आहे.दुषीत पाणी खाडीत सोडणाऱ्या या कंपनीवर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

उरण तालुक्यातील खोपटे-बांपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत ग्लोबिकाँन  इंटरनँशल कार्गो टर्मिनल प्रा.लि. या कंपनीतील आयात-निर्यात मालाची हाताळणी केली जाते. प्रकल्पातील रासायनिक मिश्रित दुषित सांडपाणी खाडीत आणि शेतीत सोडले जाते.तर  नाशवंत मालही खाडीकिनारी,शेतात आणि परिसरातील रस्त्यांवर टाकण्यात येत आहे.त्यामुळे नाशवंत मालाच्या उग्र वासातील पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे जनता हैराण झाली आहे.

सदर ग्लोबिकाँन टर्मिनलच्या दुर्गंधीकडे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ वारंवार काणाडोळा करत आहे.त्यामुळे त्याचा फटका परिसरातील नागरिक, शेतकरी, खाडीकिनाऱ्यावरील खारफुटी बरोबरच खाडीतील मासळीला बसत आहे. या अगोदरही दुषित पाण्यामुळे खाडी परिसरात मोठ्या प्रमाणात मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना घडल्या आहेत.वारंवार घडणाऱ्या घटनांनी परिसरातील शेतकरी,नागरिक, मच्छीमार त्रस्त झाले आहेत. यातच रासायनिक मिश्रित दुषित पाणी पहिल्या पडलेल्या पावसात शनिवारी ( २४) कंपनीने खाडीच्या पात्रात सोडल्याने शेतकरी, मच्छीमार संतप्त झाले आहे.

परिसरातील नागरिक, शेतकरी आणि मच्छीमारांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या  ग्लोबिकाँन टर्मिनल व्यवस्थापनावर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळानी तातडीने कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिक, शेतकरी, ग्रामपंचायतीकडून केली जात आहे.मात्र कारवाईकडे प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी सचिन आडकर यांनी प्रतिसाद दिला नाही.यामुळे नेमकी माहिती मिळाली नाही.

कंपनीतून रसायन मिश्रित दुषित पाणी शेती, खाडीत सोडण्यात येत असल्याने नागरिक, शेतकरी, मच्छीमार यांच्यावरच नव्हे जीवजंतुवरही मोठ्या प्रमाणावर विपरित परिणाम होत आहे.यासाठी कंपनीवर कारवाई करुन पायबंद घालण्याची आवश्यकता निर्माण झाली असल्याची माहिती रायगड जिल्हा किसान सभेचे सेक्रेटरी संजय ठाकूर यांनी दिली.

कंपनीकडे रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अद्यावत प्लांट आहे.त्यामुळे दुषित पाणी खाडी,शेतीत सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तक्रारदारांचा अंतस्थ हेतू वेगळाच आहे.त्यामुळेच सातत्याने कंपनी विरोधात तक्रारी केल्या जात असल्याचे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जेकब थॉमस यांनी सांगितले.

Web Title: Globicon Terminal's arbitrary release of polluted water into the bay continues in uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :uran-acउरण