Crowds in Ganesh idol schools; Export of idols from Penn started | गणेशमूर्ती शाळांमध्ये गर्दी; पेणमधून मूर्तींची निर्यात सुरू
गणेशमूर्ती शाळांमध्ये गर्दी; पेणमधून मूर्तींची निर्यात सुरू

- दत्ता म्हात्रे

पेण : मूर्तिकलेची आंतरराष्टÑीय बाजारपेठ असलेल्या पेणमध्ये महापुरामुळे मूर्तिकारांचे प्रचंड नुकसान होऊन आर्थिक फटका व्यवसायाला बसला आहे. आता परिस्थिती पूर्वपदावर आली असून बाप्पाच्या मूर्ती खरेदीसाठी मूर्तिशाळांमध्ये गर्दी होत आहे. सध्या पेण शहरासह हमरापूर, जोडे, कळवे, तांबडशेत या कलानगरीतील चित्रशाळांना गणेशभक्त भेट देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सुबक मूर्ती आणि आकर्षक रंगसंगतीमुळे पेणच्या गणेशमूर्तींची मागणी वाढत आहे. सुरुवातीला कोकण त्यानंतर मुंबई-पुण्यात पेणच्या गणपती मूर्ती विक्रीसाठी जाऊ लागल्या. त्यानंतर हळूहळू सुबक मूर्तिकलेचा आविष्कार पाहून राज्यभरातून पेणच्या गणपतीमूर्तींना मागणी येण्यास सुरुवात झाली. गेल्या काही दशकांत मूर्तींची लोकप्रियता इतकी वाढली की कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेशातूनही पेणच्या गणपतीमूर्तींना मागणी वाढून नवीन बाजारपेठ उपलब्ध झाली. महाराष्टÑसह इतर राज्यांमध्ये सुमारे २५ लाखांच्या आसपास गणेशमूर्ती निर्यात करण्यात येतात. अमेरिका, इंग्लड, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, न्यूझिलंड, फिजी, सिंगापूर, आखाती देश आणि मॉरिशस या देशांमध्ये स्थायिक झालेल्या अनिवासी भारतीय लोकांकडून पेणच्या बाप्पाच्या मूर्तींना मागणी वाढतच आहे. दरवर्षी जवळपास १५ हजार ते २० हजार गणेशमूर्ती या देशांमध्ये मे अखेरपर्यंत निर्यात केल्या जातात. त्यामुळे वर्षागणिक इथल्या मूर्तींना प्रचंड प्रमाणात मागणी वाढत आहे.
पेण शहरासह हमरापूर, तांबडशेत, जोहे, कळवे, वाशी, बोर्झे, दिव, शिर्की, रामवाडी ही गावे चित्रशाळांसाठी प्रसिद्ध आहेत. इथे पूर्वापार गणेशमूर्ती कलेचा व्यवसाय सुरू होता. हाताने मातीला आकार देणाऱ्या अनेक सुप्रसिद्ध मूर्तिकारांची पंरपरा या ठिकाणी होती. कालांतराने सार्वजनिक गणेशोत्सवाचे व्यापक रूप मिळालेले पाहता मिळणारी लोकप्रियता पाहून घरोघरी बाप्पाची स्थापना करण्याकडे सर्वधर्मीय घटकातील समाजमनाचा कल वाढत गेला. त्या अनुषंगाने मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसार पेणच्या गणेशमूर्तिकलेला प्रचंड व्यावसायिक रूप मिळाले.


वर्षभरात २० ते २५ लाख मूर्तींची निर्मिती
मूर्तिकलेचा व्यवसाय वर्षभर सुमारे ८५० ते ९०० चित्रशाळांमध्ये प्लास्टर आॅफ पॅरिस, शाडू माती अशा दोन्ही प्रकारात कच्चा व रंगवलेल्या अशा सुमारे २० ते २५ लाख गणेशमूर्ती निर्माण होत असतात; परंतु यंदाच्या महापुराचा फटका बसल्याने मूर्तिकारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

देशभरात गणेशोत्सवाचे व्यापक रूप पाहता, पेणच्या मूर्तिकारांना वर्षभर कलाविश्वातून उसंत अशी मिळतच नसते. सुमारे १० ते १५ हजार कुशल व अकुशल कामगाराला वर्षभर रोजगार देण्याइतपत हा व्यवसाय मोठ्या आर्थिक स्वरूपात विकसित झाला आहे. तब्बल १०० ते १५० कोटी झेप घेणारा या मूर्तिकलेच्या व्यवसायाला भक्कम पाठबळ देणारी कोणतीही शासकीय लाभाची योजना आजपर्यंत शासनाकडून उपलब्ध झाली नाही. या व्यवसायाच्या विकासासाठी योग्य नियोजनाद्वारे मूर्तिकारांसाठी कल्याणकारी योजनांची निर्मिती केंद्र व राज्यस्तरावर होणे गरजेचे असल्याची कारागिरांची मागणी आहे.


Web Title: Crowds in Ganesh idol schools; Export of idols from Penn started
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.