Municipal Election 2026: महायुतीचे सूत्र ठरेना अन् महाविकास आघाडीमधील जागांचा तिढा सुटेना
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: December 24, 2025 16:46 IST2025-12-24T16:45:52+5:302025-12-24T16:46:26+5:30
पडद्यामागे राजकारण तापले; शिंदेसेनेला मोजक्याच जागा देऊन भाजपकडून पर्यायी जागांचा करेक्ट कार्यक्रम : महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव

Municipal Election 2026: महायुतीचे सूत्र ठरेना अन् महाविकास आघाडीमधील जागांचा तिढा सुटेना
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रत्यक्ष मैदानापेक्षा अधिक तापलेले राजकारण सध्या बंद दाराआड सुरू आहे. महायुतीमध्ये जागावाटपाचे चित्र जवळपास ठरले असताना, महाविकास आघाडीत मात्र संशय, नाराजी आणि नेतृत्वाच्या संघर्षाने वातावरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे.
महायुतीत भाजपने सुरुवातीपासूनच “ज्याची ताकद, त्याची जागा” हे सूत्र स्वीकारल्याने बंडखोरीची शक्यता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदेसेनेला नेमक्या आणि मोजक्या जागा देऊन त्यांच्याकडील संभाव्य बंडखोरांवरही नियंत्रण ठेवले जात आहे. काही प्रभागांमध्ये ‘दुसरा पर्याय’ आधीच तयार ठेवल्याची चर्चा असून, नाव जाहीर होताच विरोध होऊ नये, यासाठी उमेदवारांना वैयक्तिक पातळीवर आधीच संकेत दिले जात आहेत.
याउलट, महाविकास आघाडीत मात्र निर्णयच होत नसल्याने अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येऊ लागला आहे. काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा रिक्तपणा आणि स्थानिक नेत्यांचे दुर्लक्ष यामुळे नाराजी उफाळून आली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांचा राजीनामा, उद्धवसेनेचे शहरप्रमुख संजोग वाघेरे यांच्या भाजप प्रवेशाने महाआघाडीत चालले काय? अशी स्थिती आहे. स्थानिक नेतृत्वाकडे निर्णयाचा अधिकार नसणे, मुंबई-पुणे पातळीवरील नेतृत्वाकडून विलंब, तसेच “कोण लढणार आणि कोण माघार घेणार” यावर स्पष्टता नसल्यामुळे आघाडीतील घटक पक्षांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक पातळीवरील फूट रोखण्याचे भाजपापुढे आव्हान
एकूणच, भाजपने निवडणूक व्यवस्थापनावर भर दिला. मात्र, स्थानिक पातळीवरील फूट रोखण्यात यश येत नसल्याचे चित्र आहे. आयारामांना पक्षात घेण्यात धन्यता मानली जात आहे. त्यावरून प्रवेशावरून श्रेयवाद सुरू आहे. शिंदेसेना आणि भाजप यांच्यात अजूनही सुर जुळलेले नाहीत. दुसरीकडे महाविकास आघाडीत नेतृत्व, समन्वय आणि विश्वास या तीन आघाड्यांवर संघर्ष सुरू असल्याचे दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत हे चित्र बदलते की अधिक बिघडते, यावरच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे राजकीय गणित अवलंबून राहणार आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच्या फक्त चर्चा...
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला असला, तरी प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर त्याचे संकेत अस्पष्ट आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यात जागांविषयी नुसती चर्चा सुरू आहे. उद्धवसेनेला जागा किती मिळणार, याची चर्चा सुरू आहे. जर कुठे प्रभागनिहाय समन्वय झाला, तर तो अपवादात्मक ठरेल, अशीच चिन्हे आहेत. यामुळे मतांचे विभाजन टाळण्याचे आव्हान महाविकास आघाडीसमोर कायम आहे. दरम्यान, मनसेच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसेने आघडीबरोबर जायचे निश्चित केले आहे. मनसेला किती जागा मिळणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.