चिंचवड मतदारसंघात विधानसभेची रंगीत तालीम, प्रचारात भाजप आणि राष्ट्रवादीचाही आखडता हात

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: May 16, 2024 02:59 PM2024-05-16T14:59:29+5:302024-05-16T15:00:17+5:30

चिंचवड विधानसभा मतदारसंघात यंदा २०१९ पेक्षा चार टक्क्यांनी कमी मतदान झाले. घटलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार हे ४ जूनलाच समजणार आहे....

In Chinchwad Constituency, colorful rehearsal of the Legislative Assembly, BJP and NCP also have a strong hand in campaigning | चिंचवड मतदारसंघात विधानसभेची रंगीत तालीम, प्रचारात भाजप आणि राष्ट्रवादीचाही आखडता हात

चिंचवड मतदारसंघात विधानसभेची रंगीत तालीम, प्रचारात भाजप आणि राष्ट्रवादीचाही आखडता हात

पिंपरी :मावळ लोकसभेची निवडणूक म्हणजे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची रंगीत तालीम असल्याने भाजपच्या व दोन्ही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचारात हात आखडता घेतल्याचे दिसून आले. प्रचारादरम्यान जेव्हा वरिष्ठ नेते व्यासपीठावर असत, तेव्हाच महायुती व महाविकास आघाडीतील आमदारकीसाठी इच्छुक नेते दिसत होते. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात यंदा २०१९ पेक्षा चार टक्क्यांनी कमी मतदान झाले. घटलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार हे ४ जूनलाच समजणार आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे मावळ लोकसभेची जागा भाजपला मिळावी, अशी येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. बारणे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. दुसरीकडे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरेही पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक होते. सुरुवातीला बारणे यांच्यासाठी निवडणूक सोपी वाटत होती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती व बारणे यांच्याविषयी दहा वर्षांतील नाराजी याचा फायदा वाघेरेंना होईल, असे चित्र मतदानातून दिसून आले.

मतदारांपर्यंत पोहोचविण्याची कसरत

शिवसेनेमधून शिंदे गट वेगळा झाल्यानंतर बारणे शिंदेंसोबत गेले, पण त्यांच्याबरोबर शिवसेनेतून मोजकेच नेते गेले. परंतु, चिंचवडला भाजपचे आमदार असल्याने येथे भाजपची ताकद आहे. राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचीही मोठी ताकद आहे, तरीही चिंचवड मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला आहे. चिंचवडमधील बहुतांश भागात बारणे यांना प्रचारादरम्यान पोहोचता आले नाही की पोहोचू दिले नाही, याबाबत चर्चा सुरू आहे. दुसरीकडे वाघेरे अनेक वर्षे राष्ट्रवादीत असल्याने त्यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांशीही चांगले संबंध आहेत.

विधानसभेची गणिते

लोकसभेच्या निवडणुकीवर विधानसभेची गणिते ठरणार आहेत. चिंचवडच्या पोटनिवडणुकीत अजित पवार गटाचे नाना काटे यांचा पराभव करत अश्विनी जगताप विजयी झाल्या होत्या. आता हे दोन्ही उमेदवार महायुतीत आहेत. भाजपच्या आमदार अश्विनी जगताप यांचे दीर व भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप हेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यातच महाविकास आघाडीकडून उमेदवारी घेण्यासाठी महायुतीतीलच काही नेते इच्छुक आहेत. त्यामुळे विधानसभेच्या तिकिटासाठी अजित पवार गट व भाजपच्या नेत्यांची दमछाक होणार आहे.

मागील दोन निवडणुकांची टक्केवारी

वर्ष- एकूण मतदार- झालेले मतदान- टक्केवारी

२०१४ : ४ लाख ५२ हजार ६४९ : २ लाख ४६ हजार ६३९ : ४८.८३

२०१९ : ५ लाख २ हजार ७४० : २ लाख ८३ हजार ४ : ५६.२९

२०२४ : ६ लाख १८ हजार २४५: ३ लाख २२ हजार ७०० : ५२.२०

Web Title: In Chinchwad Constituency, colorful rehearsal of the Legislative Assembly, BJP and NCP also have a strong hand in campaigning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.