पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 11:59 AM2024-05-25T11:59:46+5:302024-05-25T12:05:12+5:30

Water Saving Tips: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! महापालिकेने पाणीकपात जाहीर केली. १० टक्क्यांहून कमी पाणीसाठी शिल्लक

दैनंदिन जीवनात पाण्याचा काटकसरीने वापर करणे, त्याचा अपव्यय टाळणे शक्य आहे. यासाठी पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात असे मुंबई महापालिकेने नागरिंकांना आवाहन केले आहे. यावेळी पाणीकपात जाहीर करताना पालिकेने पाणी बचतीच्या काही टिप्सही दिल्या आहेत.

आवश्यक तितकेच पाणी पेल्यामध्ये घेवून प्यावे. आंघोळीसाठी शॉवरचा उपयोग न करता बादलीमध्ये पाणी घेवून आंघोळ केल्याने पाण्याची मोठी बचत होते. नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळावे. घरकामे करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका. त्याऐवजी भांड्यांमध्ये पाणी घेवून कामे उरकावीत.

वाहने धुण्यासाठी नळी न लावता भांड्यामध्ये पाणी घेवून ओल्या कापडाने वाहने पुसणे सहज शक्य असते. घरातील लादी, गॅलरी, व्हरांडा, जिने आदी धुवून काढण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसून घ्या. आदल्या दिवसाचे पाणी शिळे समजून फेकू नका. वॉशिंग मशीनमध्ये एकाचवेळी शक्य तेवढे कपडे धुतल्यास, मशीनचा पर्यायाने पाण्याचा वापर कमी होवू शकतो.

नळ तसेच वॉश बेसिनचे नळ यांचा प्रवाह मर्यादीत करणाऱया किंवा तुषार स्वरुपात पाणी प्रवाहित करणाऱया तोटी (नोझल) बाजारात सहज उपलब्ध असतात. नळांना अशा प्रकारची तोटी लावून पाण्याची तब्बल दोन तृतीयांश बचत करणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याचप्रमाणे सर्व हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी त्याचा वापर करावा.

उपाहारगृहे, हॉटेल्समध्ये ग्राहकांना आवश्यक असेल तेव्हाच पेल्यांमध्ये पाणी द्यावे. अथवा पाण्याची बाटली पुरवावी. जेणेकरुन अकारण पाण्याने भरुन ठेवलेल्या पेल्यांचे पाणी वाया जाणार नाही.

सर्व घरांमध्ये, गृहनिर्माण संस्थांमध्ये पाण्याची यंत्रणा, वाहिन्या तपासाव्यात. कोठेही गळती आढल्यास तात्काळ दुरुस्ती करुन घ्यावी, यातून पाण्याची बचत देखील होते व पाणी दूषित होत नाही. छतावरील पाण्याच्या टाक्या भरताना त्या ओसंडून वाहणार (ओव्हरफ्लो) नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

ज्या-ज्या ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, त्या सर्व व्यावसायिक व वाणिज्यिक आस्थापनांनी देखील पाण्याचा अपव्यय टाळून बचत करता येईल, अशा कार्यपद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.

एकूणच, पाणी बचतीच्या उपाययोजना अंगीकारणे सहज शक्य आहे. त्याचा अवलंब करुन मुंबईकरांनी शक्य तितकी पाणीबचत करावी, पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, महानगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.