Maharashtra Political Crisis: शिंदे गट आता ‘दसरा मेळावा’ घेणार? ठाकरेंच्या अर्जावर BMCचे दुर्लक्ष! BJPची पडद्यामागून मदत?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 11:24 AM2022-08-27T11:24:23+5:302022-08-27T11:28:31+5:30

Maharashtra Political Crisis: जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सव करून दाखवत आदित्य ठाकरेंना भाजपने शह दिल्यानंतर आता शिंदे गट उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस आणखी तीव्र होताना पाहायला मिळत आहे. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून भाजपही यामध्ये सक्रीय सहभाग घेत असून, शिवसेनेची हरतऱ्हेने कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

अलीकडेच भाजपने शिवसेनेचा गड असलेल्या वरळीतील जांबोरी मैदानावर आपला दहीहंडी उत्सव दणक्यात साजरा केल्यानंतर आता शिवसेनेला चितपट करण्यासाठी शिंदे गट सरसावल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेची शान असलेल्या दसरा मेळाव्यात खोडा घालण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेना आणि दसरा मेळावा असे एक अतूट नाते असून, या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या सभेला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात. मात्र, यंदा पाच ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने अर्ज दाखल केला असताना, महापालिकेने मात्र हात आखडता घेतल्याचे समजते. त्यामुळे आता विचारांचे सोने लुटण्याची संधी शिवसेनेला मिळणार, की एकनाथ शिंदे गटाला याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची यावरून संघर्ष सुरू आहे. शिवसेनेतील ४०हून अधिक आमदार आपल्याकडे खेचल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आता शिवसेना पक्षावरच दावा ठोकला असून, त्याबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

या दाव्याला पुष्टी मिळावी यासाठी दोन्ही गटांकडून सध्या पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची प्रतिज्ञापत्रे गोळा केली जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे शिवसेना; तसेच एकनाथ शिंदे गटाचे लक्ष लागले आहे. शिवाजी पार्क मैदानात गेली अनेक वर्षे न चुकता शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. पावसामुळे दोन-तीन वेळा मेळावा रद्द करण्याचा प्रसंग ओढवला होता.

आता शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर खरी शिवसेना कोणाची यावरून वाद सुरू झाला असून, शिवसेनेच्या प्रत्येक गोष्टींवर दावे ठोकण्याचा सपाटा दोन्ही बाजूंकडून सुरू आहे. अशावेळी यंदाच्या दसरा मेळाव्याला अधिकच महत्त्व आहे. यावेळी शिवसेनेने खबरदारीचा उपाय म्हणून मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. मात्र त्यांना परवानगी देण्यासाठी खुद्द महापालिकेनेच हात आखडता हात घेतल्याचे समजते.

उद्धव ठाकरे यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याशी याबाबत संवाद साधल्याचे समजते. मात्र, अद्याप त्यांना परवानगी मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे. राज्यात शिंदे-फडणवीस यांची सत्ता आहे. शिवसेनेला शिंदे गटाचा तर विरोध आहेच; पण भाजपचाही क्रमांक एकचा राजकीय शत्रू शिवसेनाच आहे.

दसरा मेळाव्याची परवानगी शिंदे गटाला मिळावी, यासाठी पडद्यामागून जोरदार हालचाली सुरू आहेत. शिवसेनेला परवानगी नाकारली गेल्यानंतर एकनाथ शिंदे गट या मेळाव्यासाठी परवानगी मागणार आहे. मात्र, परवानगी मिळाल्यास या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकटेच मार्गदर्शन करणार का; तसेच त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मार्गदर्शन करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.