ऋतुजा लटकेंना एकनाथ शिंदेंनी दिल्या शुभेच्छा; राज्यात रंगली चर्चा, नेमकं काय म्हणाले पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 01:27 PM2022-11-07T13:27:32+5:302022-11-07T13:32:59+5:30

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी ६६,५३० मते मिळवून विजय मिळवला.

भाजपाने माघार घेतल्यानंतरही चर्चेत असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी ६६,५३० मते मिळवून विजय मिळवला. त्यांच्या विजयामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला बळ मिळाले आहे.

विशेष म्हणजे या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची म्हणजेच १२,८०६ मते 'नोटा'ला मिळाली. मागील वेळेपेक्षा कमी मतदान होऊनही आपले पती दिवंगत आमदार रमेश लटके यांच्यापेक्षा ऋतुजा लटके यांनी जास्त मते मिळवली आहे. आमच्या पक्षाचे चिन्ह गोठवले याचे दु:ख आहे. मशाल चिन्ह मिळाले. मशाल भडकली आणि भगवा फडकला, असं ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडणुकीत राजकीय संस्कृती म्हणून आमच्या युतीने माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. ऋतुजा लटके यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदेंनी शुभेच्छा दिल्यानंतर राज्यात वेगळीच राजकीय चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, निवडणुकीअगोदरच भाजपला पराभवाचा अंदाज आला होता, त्यामुळे त्यांनी निवडणूक लढली नाही. जमिनिवरचे प्रकल्प गुजरातले गेले आहेत. हवेतील प्रकल्प महाराष्ट्रात असंही उद्धव ठाकरे म्हणाले. नोटाला एवढं मतदान कोणी केले हे सगळ्यांना माहित आहे. त्यांनी निवडणूक लढवली असती तर ही नोटाची मत त्यांना मिळाली असती, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

निवडणुकासमोर ठेवून राज्यातील प्रकल्प गुराजतला घेऊन गेले. गुजराच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रावर प्रेम वाढले आहे, प्रकल्पाबाबत चर्चा सुरू केली आहे, प्रकल्पाच्या भ्रमाचा फुगा फुटायच्याअगोदर राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, हा माझा अंदाज आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.