7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द

Virat Kohli Retires From Test Cricket: 7 मे रोजी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, आज विराट कोहलीनेही निवृत्तीची घोषणा केली आहे.

Virat Kohli Retires From Test Cricket: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आज धक्का देणारी बातमी आली. 7 मे रोजी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंर, आज 12 मे रोजी विराट कोहलीदेखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला. 6 दिवसांच्या आत या दोन दिग्गजांनी कसोटी क्रिकेटला रामराम ठोकल्यामुळे कसोटी ROKO (रोहित-कोहली) युगाचा अंत झाला.

आज कोहलीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली. 'माझा कसोटी क्रिकेटमधील प्रवास सुरू होऊन 14 वर्षे झाली. जेव्हा मी पहिल्यांदा टीम इंडियाची टेस्ट कॅप घातली, तेव्हा मला वाटले नव्हते की, हा प्रवास मला खूप काही शिकवून जाईल. कसोटी क्रिकेट हे काहीतरी वेगळे आहे. आता मी या फॉरमॅटला निरोप देत आहे. जड अंतकरणाने मी हा निर्णय घेतोय, पण मला माहित आहे की, हीच योग्य वेळ आहे. मी मनापासून सर्वांचा आभारी आहे. माझ्या कसोटी कारकिर्दीच्या आठवणी नेहमीच माझ्या चेहऱ्यावर हास्य आणतील,' असे विराटने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

विराट कोहलीच्या आधी हिटमॅन रोहित शर्माने बुधवारी (7 मे) कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. 7 मे रोजी त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आणि कसोटी क्रिकेटला निरोप दिला. पण, रोहित यापुढे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामने खेळत राहील. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराटनेही टी-20 फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहली आणि रोहित फेल- ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळताना दिसले होते. भारताला 5 सामन्यांच्या मालिकेत 1-3 असा पराभव पत्करावा लागला. मालिकेतील पहिल्या सामन्यात, म्हणजेच पर्थ कसोटीत विराट कोहलीने शतक झळकावले होते, पण त्यानंतर तो चांगली कामगिरी करू शकला नाही. त्या मालिकेतील 5 सामन्यांच्या 9 डावात कोहलीने 23.75 च्या सरासरीने फक्त 190 धावा केल्या होत्या. याच दौऱ्यात रोहित शर्मालाही संघर्ष करावा लागला. त्याचा फॉर्म इतका खराब होता की, त्याने सिडनीतील शेवटच्या कसोटीतून स्वतःला वगळले. त्याच्या जागी बुमराहने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. त्या दौऱ्यात रोहितने 3 सामन्यांच्या 5 डावात फक्त 31 धावा केल्या होत्या.

रोहितची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द- रोहित शर्मा 11 वर्षे कसोटी क्रिकेट खेळला. रोहितने 67 कसोटी सामने खेळले, त्यापैकी 24 कसोटींमध्ये त्याने कर्णधारपद भूषवले. त्याने 40.57 च्या सरासरीने एकूण 4301 धावा केल्या, ज्यामध्ये 12 शतके आणि 18 अर्धशतके समाविष्ट आहेत. रोहितने कसोटी सामन्यात 88 षटकार आणि 473 चौकार मारले. 2010 मध्ये नागपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहित कसोटी पदार्पण करणार होता, पण त्या सामन्यात नाणेफेकीच्या काही क्षण आधी त्याला एक विचित्र दुखापत झाली. यानंतर त्याचे कसोटी पदार्पण तीन वर्षांनी झाले. 2013 मध्ये कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्याच्या पदार्पणाच्या कसोटीत त्याने शतक झळकावले. मुंबईत झालेल्या त्याच्या पुढच्या कसोटीत त्याने आणखी एक शतक झळकावले. रोहितने त्याचा शेवटचा कसोटी सामना 26 डिसेंबर 2024 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला.

रोहित शर्माने आतापर्यंत 273 एकदिवसीय सामन्यांमध्ये 48.77 च्या सरासरीने 11168 धावा केल्या आहेत. त्याने 32 शतके आणि 58 अर्धशतके झळकावली आहेत. तर, त्याने 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 29.76 च्या सरासरीने 6868 धावा केल्या आहेत. या फॉर्मॅटमध्ये त्याने 5 शतके आणि 32 अर्धशतके झळकावली आहेत. गेल्या टी-20 विश्वचषकात भारताला चॅम्पियन बनवल्यानंतर रोहित शर्माने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती.

कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द- विराट कोहलीने 2008 मध्ये दांबुला येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले. त्या सामन्यात कोहलीने सलामी 12 धावा केल्या होत्या. त्यानंतर, कोहलीचे टी-20 मध्ये पदार्पण 2010 मध्ये सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेविरुद्ध झाले. त्याने 21 चेंडूत 26 धावांची खेळी केली होती. त्यानंतर किंग कोहलीने जून 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्स्टन येथे कसोटी पदार्पण केले. पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 15 धावा केल्या. विराटने शेवटची कसोटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी जानेवारी 2025 मध्ये खेळली.