कोरोनाच्या संकटात मोठ्या क्रिकेट लीगची घोषणा; 8 संघांमध्ये रंगणार 46 सामन्यांचा थरार!

जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा हा 82 लाख 88, 388 इतका झाला आहे. त्यापैकी 43 लाख 42,616 रुग्ण बरे झाले असले तरी 4 लाख 46,690 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत.

पण, इंग्लंड-वेस्ट इंडिज दौऱ्याला ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर पुन्हा एकदा हळुहळू क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनाला सुरुवात होत आहे. अजूनही ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि इंडियन प्रीमिअर लीगच्या भविष्याबाबत अनिश्चितता आहे.

त्यातच बुधवारी 8 संघांचा समावेश असलेल्या लीगची घोषणा करण्यात आली. श्रीलंकेत 25 जूनपासून टी 10 लीग सुरू होणार आहे. 12 दिवस चालणाऱ्या या लीगमध्ये 46 सामने होतील. PDC T10 असे या लीगचे नाव आहे.

श्रीलंकेत 1915 कोरोना रुग्ण आहेत आणि त्यापैकी 1397 रुग्ण बरे झाले आहेत. 11 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे श्रीलंका दौऱ्यावर आलेला इंग्लंड संघ माघारी परतला होता. त्यानंतर श्रीलंकेत होणारी ही पहिलीच क्रिकेट स्पर्धा असेल.

या लीगमध्ये अजंता मेंडिस, चमारा सिल्वा, नुआन कुलसेकरा, असेला गुणरत्ने, धम्मिका प्रसाद, सचित्रा सेनानायके, चमरा कपूगेदरा, तिलन तुषारा मिरांडो आणि इशारा अमरसिंघे आदी आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे.

हरिकेन ब्लास्टर्स, स्पार्टन हीरोज, पॉवर ग्लैडिएटर्स, चिलो वॉरियर्स आणि पुटलुम स्टार्स, ग्लोबल राइडर्स, रॉयल लायन्स, जायंट लीजेंड्स अशा दोन गटांत संघांची विभागणी केली गेली आहे.