IPL 2021 : टीम इंडियाचं भविष्य उज्ज्वल; या युवा खेळाडूंनी भल्याभल्या दिग्गजांना पाजलं पाणी!

इंडियन प्रीमिअर लीग ही युवा खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठीचे हक्काचे व्यासपीठ.. आयपीएलनं आतापर्यंत अनेक स्टार खेळाडू टीम इंडियाला दिले. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या अन् आता नवं नाव सांगायचे झाले तर टी नटराजन... हा ओघ यापुढेही असाच सुरू राहणार आहे. आयपीएलच्या १४व्या पर्वात स्टार खेळाडूंपेक्षा चर्चा राहिली ती भारताच्या अनकॅप खेळाडूंची..

आवेश खान - दिल्ली कॅपिटल्सच्या या गोलंदाजानं मोठ मोठ्या स्टार खेळाडूंना माघारी पाठवले. पर्पल कॅपच्या शर्यतीत त्यानं १४ विकेट्स घेताना दुसरे स्थान पटकावले आहे. मध्य प्रदेशच्या या गोलंदाजानं २०१४मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि २०१६च्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं भारताचे प्रतिनिधित्व केलं. २०१७मध्ये त्यानं RCBकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं, परंतु मागच्या वर्षी तो दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात दाखल झाला.

देवदत्त पडिक्कल - RCBचा सलामीवीर देवदत्त पडिक्कलनं मागच्या आयपीएलपासून स्वतःची हवा केली आहे. यूएईत झालेल्या आयपीएल २०२०त बँगलोरकडून सर्वाधिक ४७३ धावा करण्याचा पराक्रम पडिक्कलनं केला होता. यंदाच्या पर्वातही त्यानं खणखणीत शतकासह ६ सामन्यांत १९५ धावा केल्या.

ऋतुराज गायकवाड - चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याची यंदाच्या पर्वात सुरुवात निराशाजनक झाली असली तरी त्यानं दमदार कमबॅक केले. मागच्या पर्वात ६ सामन्यांत २०४ धावा करणाऱ्या ऋतुराजनं यंदाच्या पर्वातही फॅफ ड्यू प्लेसिससह CSKला दमदार सुरूवात करून दिली. त्यानं ७ सामन्यांत १९६ धावा केल्या.

हर्षल पटेल - RCBला गवसलेला हा हिराच म्हणावा लागेल. २०१८ मध्ये आयपीएल संघांनी दुर्लक्ष केलं होतं. त्यामुळे तेव्हा त्याला तो त्याचा अपमान वाटला होता आणि त्यानंतर पुन्हा मेहनत करताना हर्षलनं कमबॅक केले. यंदाच्या पर्वात त्यानं ७ सामन्यांत १७ विकेट्ससह पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थान पटकावले.

चेतन सकारिया - २८ वर्षीय चेतन हा भावनगर जिल्ह्यात राहतो. त्याचे वडिल कांजीभाई घराचा आर्थिक गाढा हाकण्यासाठी टॅम्पो चालवायचे. चेतननं क्रिकेटपटू व्हावं असं त्यांची इच्छा नव्हती. पण, चेतनच्या काकांनी त्याला मदत केली. कूच बिहार ट्रॉफीत त्यानं सौराष्ट्रच्या १९ वर्षांखालील संघाकडून सहा सामन्यांत १८ विकेट्स घेतल्या. चेतननं राजस्थान रॉयल्ससाठी या पर्वात ७ सामन्यांत ७ विकेट्स घेतल्या.

अर्षदीप सिंग - भारताच्या १९ वर्षांखालील संघात न्यूझीलंड दौऱ्यावर दमदार कामगिरी करताना अर्षदीपनं सर्वांचे लक्ष वेधले होते. ६.३ फुट उंचीच्या या गोलंदाजानं राजस्थानच्या २३ वर्षांखालील संघाकडून एकाच दिवशी ८ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता आणि त्याचवेळी पंजाब किंग्सनं त्याला आपल्या ताफ्यात घेतले. या पर्वात त्यानं ७ विकेट्स घेतल्या. डेथ ओव्हरमध्ये संघाला त्याचा चांगला फायदा होत आहे.

शाहरुख खान - शाहरुख खान हा तामिळनाडूचा युवा फलंदाज असून सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत त्यानं दमदार कामगिरी केली आहे. त्यानं २२० च्या स्ट्राईक रेटनं तुफान फटकेबाजी केली होती. बॉलिवूड स्टार शाहरुख खान याच्या नावावरूनच या क्रिकेटपटूचं नाव ठेवण्यात आलं असलं तर तो रजनीकांत याचा जबरा फॅन आहे. पंजाब किंग्सकडून त्यानं ८ सामन्यांत १०७ धावा केल्या.

हरप्रीत ब्रार - पंजाब किंग्सच्या या फिरकी गोलंदाजानं आयपीएल २०२१मधील पहिल्याच सामन्यात विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल व एबी डिव्हिलियर्स यांना ७ चेंडूंत माघारी पाठवून धुरळाच उडवला. आयपीएलमध्ये येण्यापूर्वी हरप्रीतनं ७ वर्ष स्थानिक क्रिकेटमध्ये बिग सिक्स हिटर असं नाव कमावलं. आयपीएलसाठी तो सतत ट्रायलही देत होता, परंतु निवड होत नसल्यानं तो हताश झाला होता. ३ वर्षांपूर्वी त्यानं जवळपास क्रिकेट सोडून कुटुंबीयांसोबत कॅनडात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला होता. पण, पंजाबनं त्याची निवड केली अन् तो भारतात थांबला.