Corona Virus : निधी गोळा करण्यासाठी शोएब अख्तरनं घेतली 'शाहरुख खान'च्या नावाची अशी मदत!

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 46 लाख 42,506 इतकी झाली आहे. त्यापैकी 17 लाख 68,156 रुग्ण बरे झाले असले तरी 3 लाख 08,866 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

पाकिस्तानातील कोरोना रुग्णांची संख्या 38,799 इतकी झाली आहे. त्यापैकी 10,880 जणं बरी झाली असली तरी 834 जण दगावली आहेत.

पाकिस्तान सरकारला मदत करण्यासाठी तेथील अनेक सेलिब्रेटी पुढे आले आहेत. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी त्याच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजूंना धान्य पुरवण्याचं काम करत आहे.

माजी गोलंदाज शोएब अख्तरही आता मदतीसाठी पुढे आला असून त्यानं त्यासाठी अप्रत्यक्षरित्या बॉलिवूडचा किंग खान शाहरुख याची मदत घेतली आहे.

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये अख्तरनं 2008मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं आणि त्यावेळी मिळालेली एक भेट त्यानं दान केली.

कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना एका सामन्यात शोएबला सामनावीरचा पुरस्कार म्हणून शाहरुख खान याची स्वाक्षरी असलेले हॅल्मेट दिले गेले होते.

15 वर्षांपूर्वी मिळालेलं हॅल्मेट दान करण्याचा निर्णय अख्तरनं घेतल्याची माहिती पाकिस्तानचे टेनिसपटू ऐसाम उल हक कुरेशी यांनी ट्विटरवरून दिली.

आयपीएलमधील पदार्पणाच्या सामन्यात अख्तरनं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 3 षटकांत 11 धावा देताना चार विकेट्स घेतल्या होत्या. त्यानं गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, एबी डिव्हिलियर्स आणि मनोज तिवारी यांची विकेट घेतली होती.