राजस्थान रॉयल्सच्या थरारक विजयाचा 'मॅजिकल' क्षण; अनुभवा एका क्लिकवर!

RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यातल्या सामना रोमहर्षक झाला. KXIPच्या 223 धावांचे आव्हान RRला पेलवणार नाही, असेच वाटत होते. पण, शारजाहच्या खेळपट्टीवर चौकार-षटकारांच्या आतषबाजीसह थरार अनुभवायला मिळाला नाही तर नवलच.

मयांक अग्रवालचे ( Mayank Agarwal) IPL मधील पहिले शतक अन् लोकेश राहुलचा ( KL Rahul) सातत्यपूर्ण खेळ याच्या जोरावर KXIPनं 20 षटकांत 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा केला. त्यांना राजस्थान रॉयल्सकडून ( RR) सडेतोड उत्तर मिळाले. स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) आणि संजू सॅमसननं ( Sanju Samson) यांनीही षटकारांचा पाऊस पाडला.

संजू सॅमसन मैदानावर असेपर्यंत सामना RR सहज जिंकतील असा विश्वास होता, परंतु मोहम्मद शमीनं ( Mohammed Shami) टाकलेलं 17 वे षटक सामन्याला कलाटणी देणारं ठरेल असे वाटले. पहिल्याच चेंडूवर त्यानं संजू सॅमसनला बाद केले आणि क्रिजवर राहुल टेवाटिया ( Rahul Tewatia) असल्यानं RRच्या आशा मावळल्या.

पण, राहुल टेवाटिया ( Rahul Tewatia) ज्या पद्धतीनं खेळला त्याला तोडच नाही. शेल्डन कॉट्रेलच्या ( Sheldon Cottrell) एका षटकात राहुलनं सलग चार आणि अखेरच्या चेंडूवर एक असे पाच खणखणीत षटकार खेचून 30 धावा जोडल्या. टेवाटियाच्या या फटकेबाजीनंतर KXIPच्या खेळाडूंचा चेहरा पडला.

मयांक अग्रवालनं ( Mayank Agarwal) 50 चेंडूंत 10 चौकार व 7 षटकारांसह 106 धावा चोपल्या. लोकेश राहुलने ( KL Rahul) 54 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 69 धावा केल्या. मयांक व लोकेश यांनी 183 धावांची भागीदारी करून भक्कम पाया रचल्यानंतर अखेरच्या षटकांत निकोलस पूरन व ग्लेन मॅक्सवेल यांनी मुक्तपणे फटकेबाजी केली आणि KXIPला 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा करून दिला. मॅक्सवेल 12, तर पूरन 25 धावांवर नाबाद राहिले.

लक्ष्याचा पाठलाग करताना RR ची सुरुवात निराशाजनक झाली. जोस बटलर लगेच माघारी परतला, पंरतु त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ व संजू सॅमसन यांनी फटकेबाजी केली. या दोघांची 81 धावांची भागीदारी 9व्या षटकात संपुष्टात आली. RRला 100 धावांवर दुसरा धक्का बसला तो स्टीव्ह स्मिथचा. त्यानं 27 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 50 धावा केल्या.

सॅमसन एका बाजूनं तुफान फटकेबाजी करत होता. चेन्नई सुपर किंग्सप्रमाणे KXIPलाही सॅमसनचा तडाखा बसत होता. पण, मोहम्मद शमीनं सामना फिरवला. 17व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्यानं सॅमसनला माघारी पाठवले. सॅमसन 42 चेंडूंत 4 चौकार व 7 षटकार करून 85 धावांवर माघारी परतला.

RRच्या हातून सामना निसटला असेच वाटले, परंतु राहुल टेवाटियानं ( Rahul Tewatia) शेल्डन कॉट्रेलनं टाकलेल्या 18व्या षटकाच्या पहिल्या चार चेंडूवंर चार खणखणीत षटकार खेचून सामना 14 चेंडूंत 27 धावा असा चुरशीचा बनवला. राहुलनं 18व्या षटकात पाच षटकारांसह 30 धावा चोपल्या.

12 चेंडू 21 धावांची गरज असताना पुन्हा एकदा शमीनं 19व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर RRला धक्का दिला. रॉबीन उथप्पा 9 धावांवर बाद झाला. पण, जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) शमीला दोन खणखणीत षटकार खेचले आणि सामना पुन्हा राजस्थान रॉयल्सच्या बाजूनं झुकवला.

राहुल टेवाटियानं 31 चेंडूंत 7 षटकारांसह 53 धावा करताना राजस्थानचा विजय पक्का केला. टॉम कुरनने चौकार मारून RRचा विजय पक्का केला. RRने 4 विकेट्स राखून सामना जिंकला. या विजयासह राजस्थान रॉयल्सनं IPL इतिहासातिल सर्वाधिक धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा स्वतःचाच विक्रम मोडला. यापूर्वी त्यांनी 2008मध्ये डेक्कन चार्जर्सचे 215 धावांचे लक्ष्य पार केले होते.