हिटमॅन रोहित शर्माचा ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पराक्रम

दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने दिल्लीवर विजय मिळवला. हार्दिक आणि कृणाल या दोन्ही पंड्या बंधूंच्या फटकेबाजीमुळे मुंबईला दिल्लीपुढे 169 धावांचे आव्हान ठेवता आले. या आव्हानाचा पाठलाग करण्याता दिल्लीचा संघ अपयशी ठरला.

मुंबईने या सामन्यात दिल्लीवर 40 धावांनी विजय मिळवला. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे, त्याचबरोबर दिल्लीला त्यांच्या मैदानात पराभूत केले.

रोहितने 22 चेंडूंमध्ये 30 धावा केल्या, तर डीकॉकने 27 चेंडूंत 35 धावा केल्या. या दोघांनी सात षटकांमध्ये 57 धावांची सलामी दिली. पण हे दोघे बाद झाल्यावर मुंबईची धावगती थोडीशी कमी झाली. पण त्यानंतर कृणाल आणि हार्दिक या पंड्या बंधूंनी सावरले.

रोहितने 30 धावांच्या खेळीसह ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 8000 धावा करण्याचा विक्रम नावावर केला. सुरेश रैना आणि विराट कोहली यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो तिसऱा भारतीय खेळाडू ठरला.

रोहितला 8000 धावा पूर्ण करण्यासाठी 12 धावांची आवश्यकता होती. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने 12वी धाव घेताच हा विक्रम केला.

रोहितच्या नावावर 8018 धावा आहेत. 2008 पासून रोहितने आयपीएलमध्ये 181 सामन्यांत 4716 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांत रोहितच्या नावावर 2331 धावा आहेत.