रोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'

भारताने रविवारी आशिया चषक क्रिकेट सुपर फोर लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ९ गडी व ६३ चेंडू राखून पराभव केला. गोलंदाजांच्या अचूक माऱ्यानंतर सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी वैयक्तिक शतके झळकावित सलामीला केलेल्या २१० धावांच्या भागीदारीच्या जोरावर हा विजय मिळवल. रोहित - धवनच्या या एका भागीदारीने विक्रमांचे अनेक शिखर सर केले आहेत. कोणते ते पाहा...

२१० - धावांचा पाठलाग करताना भारताकडून झालेली ही सर्वोत्तम भागीदारी आहे. यापूर्वी २००९ मध्ये वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी न्यूझीलंडविरुद्ध २०१ धावांची भागीदारी केली होती.

१५९ - सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांनी १९९८ मध्ये केलेल्या १५९ धावा या पाकिस्तानविरुद्ध भारताने केलेली सर्वोत्तम भागीदारी होती. तो विक्रम रोहित- धवन या जोडीने मोडला. आशिया चषक स्पर्धेतीलही भारतीय सलामीवीरांची ही सर्वोत्तम भागीदारी आहे.

231 - पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही विकेटने केलेली ही भारताची दुसरी सर्वोत्तम खेळी आहे. हा विक्रम सचिन तेंडुलकर आणि नवज्योत सिंह सिध्दू यांच्या नावे आहे. १९९६ साली या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी २३१ धावांची भागीदारी केली होती.

७ - एकाच वन डे सामन्यात दोन्ही सलामीवीरांनी शतक झळकावण्याक्जी ही सातवी वेळ आहे. रोहित आणि धवन यांनी प्रथमच अशी कामगिरी केली आहे. धावांचा पाठलाग करताना यापूर्वी २००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांनी इंग्लंडविरुद्ध वैयक्तिक शतक झळकावले होते.

१३ - रोहित आणि धवन यांच्यातील ही वन डे क्रिकेटमधील १३ वी शतकी भागीदारी आहे. या क्रमवारीत तेंडुलकर आणि गांगुली २१ शतकी भागीदारीसह आघाडीवर आहेत.