विश्वचषकाच्या संघात मधल्या फळीत चुरस

आगामी विश्वचषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून आशिया स्पर्धेत सर्व खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत. या स्पर्धेत छाप पाडून विश्वचषकासाठी संघात स्थान पक्के करण्याचे सर्वांचे लक्ष्य आहे. भारतीय संघातही अशीच चुरस पाहायला मिळत आहे. विशेष करून मधल्या फळीतील जागेसाठी सध्या संघात असलेले आणि संघात येऊ पाहणाऱ्या खेळाडूंमध्ये चढाओढ रंगताना दिसत आहे.

अंबाती रायडूची वन डेतील सरासरी 50.23 इतकी आहे, परंतु 32 वर्षीय रायडूच्या खात्यात केवळ 32 सामने आहेत. राग आणि फिटनेसच्या कारणामुळे त्याला संघात स्थान कायम राखणे जमले नाही. श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेत त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीही केलेली आहे. मात्र 2016 मध्ये गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो वर्षभर संघाबाहेर होता. इंग्लंड दौऱ्यासाठी घेण्यात आलेली यो-यो चाचणी पास करण्यात तो अपयशी ठरला होता. आयपीएलमध्ये मात्र त्याची कामगिरी बोलकी आहे. त्याने 16 सामन्यांत 149.75च्या स्ट्राईक रेटने 602 धावा केल्या आहेत.

33 वर्षीय केदार जाधवही संघात स्थान टिकून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध मागील वर्षी 76 चेंडूंत 120 धावांची खेळी केली होती. त्याच सामन्यात त्याने विराट कोहलीसोबत 200 धावांची भागीदारी करताना संघाला 351 धावांचा डोंगर उभा करून दिला होता. त्यापाठोपाठ कोलकाता येथे त्याने 75 चेंडूंत 96 धावा कुटल्या. आयपीएलमध्ये त्याला दुखापतीमुळे केवळ एकच सामना खेळून माघार घ्यावी लागली होती. त्याने 40 वन डे सामन्यांत 798 धावा केल्या आहेत आणि 16 विकेट घेतल्या आहेत.

आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या श्रेयस अय्यरने श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. त्याने 2 वन डेत 88 व 65 धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. भारत अ संघाकडून त्याला पाच सामन्यांत केवळ 95 धावाच करता आल्या आहेत. आशिया चषक स्पर्धेत त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. मात्र विजय हजारे चषक स्पर्धेत चांगली कामगिरी करून तो संघात कमबॅक करण्यासाठी आतुर आहे.

दिनेश कार्तिकला नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यात साजेशी कामगिरी करता आलेली नाही. निदाहाक चषक स्पर्धेत त्याने भारतीय संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला होता. महेंद्रसिंग धोनीचे संघातील स्थान कायम असल्याने फलंदाज म्हणून कार्तिकला संघात संधी मिळू शकते.

अजिंक्य रहाणे सध्या कारकिर्दीतील सर्वात बॅड पॅचमधून जात आहे. त्याला वन डे आणि टी-20 संघात स्थान मिळाले नाही आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो अपयशी ठरला. तांत्रिक चुका आणि गमावलेला आत्मविश्वास हे रहाणेसाठी मारक ठरत आहेत, परंतु विजय हजारे चषक स्पर्धेच्या माध्यमातून तो वन डे संघात कमबॅकसाठी प्रयत्नशील असणार आहे.

सुरेश रैनाला इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत संधी मिळाली, परंतु त्याचे त्याने सोने केले नाही. मधल्या फळीतील शर्यतीत तो पिछाडीवर असला तरी अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचा विचार केला जाऊ शकतो.

मधल्या फळीतील फलंदाजांसाठी मनिष पांडे आघाडीवर आहे. त्याने भारत अ संघाकडून चांगली कामगिरी केली आहे आणि आशिया चषक स्पर्धेत चांगली कामगिरी करून तो विश्वचषक स्पर्धेत स्थान पटकावण्यासाठी सज्ज आहे.