... तर शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनचा लोगो लावून मैदानावर उतरणार पाकिस्तानचा संघ!

पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) त्यांच्या संघाला मोठ्या तोऱ्यात इंग्लंड दौऱ्यावर पाठवले. इंग्लंड दौऱ्यावर पाकिस्तानचे सर्व खेळाडू दाखल झाले असून ते सध्या क्वारंटाईन आहेत. त्यांनी मैदानावर सरावाला सुरुवात केली आहे.

पाकिस्तान संघासमोर वेगळंच संकट उभं राहिलं आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाला तेथे स्पॉन्सर्स मिळेनासे झाले आहेत आणि आतापर्यंत केवळ एकाच कंपनीनं स्पॉन्सरशीपसाठी बोली लावली आहे.

आधीच्या स्पॉन्सर्ससोबतचा करार केव्हाच संपुष्टात आला आहे आणि त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी खेळाडूंच्या ट्रेनिंग किटवर एकच लोगो दिसत आहे.

एका कंपनीनं लावलेल्या बोलीची किंमत ही पीसीबीच्या जून्या स्पॉन्सर्सच्या रकमेतील 30 टक्केच रक्कम भरून काढत आहे.

कोरोना व्हायरसमुळे कोणी स्पॉन्सर्स पुढे येत नसल्याचे पीसीबीच्या मार्केटींग विभागानं सांगितले. याशिवाय पीसीबीला स्थानिक क्रिकेट स्पर्धांसाठीही स्पॉन्सर शोधण्यात अडचण येत आहे.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी त्यांना आणखी स्पॉन्सर्स मिळण्याची त्यांना आशा आहे. स्पॉन्सर्सशीपमधून खेळाडूंनाही रक्कम मिळते.

कसोटी सामन्यासाठी 4 लाख 50 हजार आणि वन डे व ट्वेंटी-20 साठी 2 लाख 25 हजार खेळाडूंना दिले जातात. पण, आता तेही मिळणार नाही.

पाकिस्तान क्रिकेट मंडळाला स्पॉन्सर न मिळाल्यास त्यांना इंग्लंड दौऱ्यावर संस्थांचा लोगो लावून खेळावं लागेल. त्यामुळे शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन आणि ईडी फाऊंडेशनचे लोगो टीमच्या जर्सीवर दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.

इंग्लंडमध्ये दाखल झालेले खेळाडू - अजहर अली (कर्णधार), बाबर आझम (उपकर्णधार), आबिद अली, असद शफिक, फहीम अशरफ, फवाद आलम, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, इमाम-उल-हक, खुशदिल शाह, मोहम्मद अब्बास, मूसा खान, नसीम शाह, रोहेल नजीर, सरफराज अहमद, शाहीन शाह अफ्रिदी, शान मसूद, सोहेल खान, उस्मान शिनवारी आणि यासिर शाह.