IPL 2020 : गौतम गंभीरची MS Dhoniवर टीका; ते तीन Six म्हणजे वैयक्तिक धावा, याला नेतृत्व म्हणत नाही!

Indian Premier League ( IPL 2020) 13व्या पर्वातील मंगळवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ( Rajasthan Royals) 16 धावांनी चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) पराभूत केले. 217 धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर असताना महेंद्रसिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni) 7व्या क्रमांकावर फलंदाजीला आला.

त्यावरून भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) यानं टीका केली. CSKचे फ्रंटला राहून नेतृत्व करण्यात धोनी अपयशी ठरला, असे गंभीर म्हणाला. शिवाय धोनीनं मारलेले ते 3 षटकार हे त्याच्या वैयक्तिक धावा होत्या, त्याचा संघाला काहीच उपयोग झाला नाही, असेही विधान त्यानं केले.

सामन्यात संजू सॅमसन ( Sanju Samson) आणि स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith) यांच्या वादळी खेळीनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) ने 20 व्या षटकात लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर 30 धावा चोपल्या. RRने निर्धारित षटकात 7 बाद 216 धावा चोपल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना शेन वॉटसन ( Shane Watson) 33 धावा करून माघारी परतला.

फॅफ डू प्लेसिसनं ( Faf du Plessis) 37 चेंडूंत 72 धावा चोपल्या. त्यात 1 चौकार व 7 षटकारांचा समावेश होता. धोनीने अखेरच्या षटकात काही उत्तुंग फटके मारले, परंतु तो पर्यंत खुप उशीर झाला होता. CSKने 6 बाद 200 धावा केल्या. RRने 16 धावांनी हा सामना जिंकला. धोनीनं 17 चेंडूंत 3 षटकारांसह नाबाद 29 धावा केल्या.

पण, संघासमोर मोठे आव्हान असताना कर्णधार धोनीनं सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येणं, सर्वांना खटकलं. गंभीरनं तर टीकाच केली. तो म्हणाला, हेच जर कुणी दुसऱ्या कर्णधारानं केलं असतं, तर त्याच्यावर प्रचंड टीका झाली असती. पण, हा महेंद्रसिंग धोनी आहे आणि त्यामुळे लोकं यावर चर्चा करत नाहीत. तुमच्याकडे सुरेश रैना नाही, तरीही तू सॅम कुरनला पुढे करून त्याला स्वतःपेक्षा चांगला फलंदाज का भासवत आहेस. ऋतुराज गायकवाड, कुरन, केदार जाधव, फॅफ डू प्लेसिस, मुरली विजय यांना पुढे पाठवून ते तुझ्यापेक्षा चांगले फलंदाज आहेत, असे लोकांना मानण्यास भाग पाडतोस का?''

''महेंद्रसिंग धोनी 7व्या क्रमांकावर फलंदाजीला आला? गायकवाड, कुरन यांना त्यानं स्वतःच्या आधी पाठवलं. याला काहीच अर्थ नाही. खऱं तर अशा परिस्थितीत तू पुढे येऊन नेतृत्व करायला हवं होतं आणि याला नेतृत्व म्हणत नाही. त्यामुळे अखेरच्या षटकात त्याने मारलेले षटक हे संघाचा काहीच कामाचे नाही, ते वैयक्तिक धावा आहेत,''असेही गंभीर म्हणाला.

महेंद्रसिंग धोनी 7व्या क्रमांकाला का आला? - सामन्यानंतर धोनीनं 7व्या क्रमांकावर येण्यामागचं कारण सांगितलं. तो म्हणाला,''मी बराच कालावधी फलंदाजी केलेली नाही. 14 दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीतही फार मदत मिळाली नाही. शिवाय ही लीगची सुरुवातच आहे आणि त्यामुळे काही नवीन गोष्टींची चाचपणी करायची होती. त्यामुळे सॅमला संधी दिली. आता प्रयोग करण्याची संधी आहे. जर ते यशस्वी झाले नाही, तर आपल्या जुन्हा स्ट्रॅटजीनं मैदानावर उतरू.''

Read in English