रिषभ पंतचा 'बेबी सिटर' टॅग आता हार्दिक पांड्याला, जाणून घ्या कारण

भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळाडूंच्या कामगिरीसह रिषभ पंतच्या बेबी सिटिंगचे किस्सेच अधिक चर्चिले गेले होते. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टीम पेन याने रिषभ पंतला बेबी सिटिंग करशील का विचारले होते. पंतनेही त्याचे आव्हान स्वीकारले आणि पेनच्या मुलांना सांभाळलेही. त्यानंतर पंत अनेकदा टीम इंडियातील सदस्यांच्या मुलांचा सांभाळ करताना दिसला होता. पण, आता हा बेबी सिटरचा टॅग हार्दिक पांड्यानं घेतला आहे.

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. ट्वेंटी-20 व वन डे मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाने कसोटी मालिकेकडे मोर्चा वळवला आहे आणि दोन सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघात हार्दिक पांड्याचा समावेश करण्यात आलेला नाही.

वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान हार्दिकला दुखापत झाली होती आणि त्याला विश्रांती मिळावी म्हणून त्याला विंडीज दौऱ्यापासून दूर ठेवण्यात आले आहे.

पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी हार्दिक कसून मेहनत घेत आहे. पण, फावल्या वेळेत हार्दिक बेबी सिटिंग करताना दिसला.

स्टार स्पोट्स वाहिनीवरील अँकर जतीन सप्रू याच्या मुलीची काळजी घेताना हार्दिक दिसला. त्याने तिच्यासोबतचा व्हिडीओही इंस्टाग्रामवर शेअर केला होता.

हार्दिकने रविवारचा संपूर्ण दिवस सप्रूच्या मुलीसोबत खेळण्यात घालवला. त्यानं त्याला “Babysitting Sunday”असा टॅगही लावला.