इरफान पठाण कमबॅक करतोय; सलमान खानच्या भावाच्या संघाकडून ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळणार!

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण ( Irfan Pathan) पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी करताना दिसणार आहे.

भारताच्या 2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि 2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयी संघाचा सदस्य असलेल्या इरफाननं 4 जानेवारी 2020 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

इरफान 2012मध्ये टीम इंडियाकडून अखेरचा खेळला होता आणि त्यानंतर त्याला संघातून कॉल आलाच नाही.

2017मध्ये त्यानं अखेरचा IPL सामना खेळला होता. त्यानंतर तो समालोचकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाला.

इरफाननं 29 कसोटी, 120 वन डे आणि 24 ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले. कसोटीत त्याच्या नावावर 1105 धावा व 100 विकेट्स आहेत.

ट्वेंटी-20त 172 धावा व 28 विकेट्स, तर वन डेत 1544 धावा व 173 विकेट्स त्याने घेतल्या आहेत. IPLमध्येही त्यानं 103 सामन्यांत 1139 धावा आणि 80 विकेट्स घेतल्या आहेत.

इरफान पठाण २१ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या लंका प्रीमिअर लीगमध्ये ( Lanka Premier League) खेळताना दिसणारा आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकर होणे अपेक्षित आहे.

Sportstar च्या वृत्तानुसार बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा भाऊ सोहैल खान याच्या मालकिच्या कँडी टस्कर्स संघाकडून इरफान पठाण खेळणार आहे.

मागील आठवड्यात झालेल्या लिलावात मनवींदर बिस्ला व मनप्रीत गोनी या दोन भारतीयांना लंका प्रीमिअर लीगमधील संघांनी करारबद्ध केलं.

कँडी संघाकडून वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेल, लंकेचा कुसल परेला, कुसल मेंडीस, नुवान प्रदीप आणि इंग्लंडचा लायम प्लंकेट खेळणार आहेत.