IPL 2021: आयपीएल म्हणजे मनोरंजन नाही!, स्पर्धा रद्द करावी की नाही? भारतीय गोलंदाजानं रोखठोक सांगितलं...

IPL 2021: देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आयपीएलच्या आयोजनावर आता टीका केली जाऊ लागली आहे. यावर भारतीय गोलंदाज जयदेव उनाडकट यानं रोखठोक मत व्यक्त केलं आहे. (The IPL is not entertainment says Jaydev Unadkat opines on whether the tournament should continue or not)

IPL 2021: आयपीएलचं सध्या १४ वं सीझन सुरू आहे. पण देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आयपीएलच्या आयोजनावर आता टीका होऊ लागली आहे.

देशातील महामारीची स्थिती लक्षात घेता आयपीएल स्पर्धा थांबवायला हवी असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. देशात सध्या दिवसागणिक ३ लाखांहून अधिक नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडत आहे. त्यामुळे देशातील आरोग्य व्यवस्था देखील अपुरी पडू लागली आहे.

राजस्थान रॉयल्स संघाचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट यानंही आता आयपीएल स्पर्धा रद्द करण्याच्या वादात उडी घेतली आहे. सध्याच्या कठीण काळात सर्व नियमांचं पालन करुन बायो बबलमध्ये राहणं अतिशय आव्हानात्मक असल्याचं जयदेव उनाडकट म्हणाला.

यासोबतच आयपीएल स्पर्धा सुरू राहावी कारण यावर स्पर्धेशी निगडीत अनेकांचं पोट अवलंबून आहे, असं स्पष्ट मत जयदेव उनाडकट यानं व्यक्त केलं आहे. आयपीएल म्हणजे मनोरंजन नसल्याचंही उनाडकट म्हणाला.

"आयपीएल म्हणजे मनोरंजन नाही. सध्याचा काळ पाहता मनोरंजन असं यात काही नाही. हे आमच्यासाठी एक काम आहे आणि अनेकांचं पोट यावर अवलंबून आहे. स्पर्धेचा भाग असलेल्या हजारो लोकांना यातून मदत होतेय", असं जयदेव म्हणाला.

जयदेवनं यावेळी त्याच्या कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचीही माहिती दिली. "माझ्या कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लागण झाली होती. पण आम्ही आमचं काम सोडलेलं नाही. त्यांच्यासाठी औषधं आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देताना खूप धडपड करावी लागली. तरीही आपण सर्व या कठीण प्रसंगात एकत्र आहोत", असं जयदेव म्हणाला.

"क्रिकेटच्या व्यासपीठातून एकत्र राहण्याचा संदेश देता येत असेल तर त्याची नक्कीच मदत होतेय. आम्ही डॉक्टर होऊ शकत नाही. पण एक मदतनीस नक्कीच ठरू शकतो", असंही जयदेवनं सांगितलं.

भारतातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर काही परदेशी खेळाडूंनी स्पर्धेतून माघार देखील घेतली आहे. यात ऑस्ट्रेलियाच्या अँड्रयू टाय, अॅडम झम्पा, केन रिचर्डसन यांचा समावेश आहे. याशिवाय आणखी काही ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राजस्थान रॉयल्स संघाचा विचार करायचा झाल्यास यंदाच्या आयपीएलमध्ये संघाला मोठे धक्के बसले आहेत. जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे स्पर्धेत सहभागीच होऊ शकला नाही. तर बेन स्टोक्स दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. अँड्र्यू टायनं तर माघार घेतली आणि लियाम लिव्हिंगस्टोन यानं बायो बबलमुळे थकवा येत असल्याचं सांगत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे.