IPL 2021: धोनी अन् शाहरुख खानमध्ये बराच वेळ चर्चा, सर्वच थक्क; नेमकं काय घडलं? पाहा...

IPl 2021: आयपीएलमध्ये शुक्रवारी चेन्नई सुपरकिंग्ज आणि पंजाब किंग्जमध्ये वानखेडे मैदानावर लढत झाली. यात चेन्नईनं विजय प्राप्त केला. पण मैदानात एका गोष्टीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. (ipl 2021 shahrukh khan met with ms dhoni after csk vs pbks match in mumbai)

महेंद्रसिंग धोनी म्हणजे एक चालतं फिरतं क्रिकेटचं विद्यापीठ झालंय असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्येक युवा क्रिकेटपटूला धोनीसोबत बोलावं. त्याचं मार्गदर्शन घ्यावं अशी इच्छा असते.

धोनी देखील स्वत: युवा क्रिकेटपटूंशी मनमोकळेपणाने बोलताना आणि अनुभव शेअर करताना आपण पाहिलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीनं निवृत्ती घेतलेली असली तरी आयपीएलमध्ये धोनी चेन्नईकडून मैदानात उतराना आपल्याला दिसतो.

धोनी मैदानात असला की प्रतिस्पर्धी संघातील युवा खेळाडू देखील त्याच्याशी बोलायची संधी हेरत असतात हे आपण याआधीही पाहिलं आहे. असंच काहीसं चेन्नई वि. पंजाब सामन्यातही पाहायला मिळालं.

पंजाब किंग्ज संघात दाखल झालेला युवा क्रिकेटपटू शाहरुख खान यानं यंदाच्या लिलावात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अभिनेता शाहरुख खानसोबतच्या नामसाधर्म्यामुळे तो चर्चेत तर आलाच पण स्थानिक क्रिकेटमध्ये त्याच्या कामगिरीनंही तो चमकला आहे. त्याचंच फळ त्याला आयपीएलमध्येही मिळालं आणि तब्बल ५ कोटींच्या बोलीसह पंजाब किंग्जनं त्याला संघात दाखल करुन घेतलंय.

चेन्नई विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जचा युवा खेळाडू शाहरुख खान महेंद्रसिंग धोनीशी बराच वेळ चर्चा करताना पाहायला मिळाला. अर्थात शाहरुख यावेळी धोनीकडून टिप्स घेत होता.

विशेष म्हणजे, धोनीनंही अगदी त्याच्या जवळ बसून बराच वेळ त्याच्याशी चर्चा केली आणि त्याच्या खेळासाठी त्याला मार्गदर्शन केलं. यातूनच धोनीचं युवा क्रिकेटपटूंच्या स्थानिक कामगिरीकडे बारीक लक्ष असतं हे यातून दिसून येतं.

पंजाब किंग्जच्या शाहरुख खान यानं सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. तर चेन्नई विरुद्धच्या शुक्रवारच्या सामन्यातही त्यानं ३६ चेंडूत ४७ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. यात ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे.

शाहरुख खान हा चेन्नई सुपरकिंग्ज आणि पंजाब किंग्ज विरुद्धच्या कालच्या सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज ठरला. यासाठी त्याचा सामन्यानंतर सन्मान करण्यात आला. त्यानंतर शाहरुख थेट धोनीकडे गेला आणि त्याचं मार्गदर्शन घेतलं.

शाहरुख खान सामन्याच्या अखेरपर्यंत जर मैदानात टिकला असता तर नक्कीच पंजाब किंग्जच्या धावसंख्येत आणखी १० ते २० धावांची वाढ झाली असती.

पंजाब किंग्जच्या संघात शाहरुख पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरतो. त्यामुळे सामन्याचा उत्तम फिनिशर कसं व्हावं याच्या टिप्स त्यानं धोनीकडून जाणून घेतल्या असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.