IPL 2021: धोनी विरुद्धच्या सामन्यापूर्वी रिकी पाँटिंगचं सुरेश रैनाबाबत मोठं विधान, म्हणाला...

IPL 2021, CSK vs DC: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज असा सामना होतोय. या सामन्यापूर्वी रिकी पाँटिंगनं सुरेश रैनाबाबत एक महत्वाचं विधान केलंय.

आयपीएलच्या यंदाच्या पर्वाची सुरुवात मुंबई वि. बंगळुरू विरुद्धच्या सामन्यानं झाल्यानंतर आज मागच्या मोसमातील उपविजेता दिल्ली कॅपिटल्सची लढत चेन्नई सुपरकिंग्जसोबत होतेय.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांच्या उपस्थितीविना सामना खेळवला जाणार आहे. आजच्या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना मैदानात उतरणार आहे.

सुरेश रैना चेन्नई सुपरकिंग्ज संघासाठी हुकमाचा एक्का समजला जातो. मागच्या मोसमात रैना वैयक्तिक कारणास्तव आयपीएल खेळला नव्हता. त्यानंतर आता तो पुन्हा एकदा सज्ज झाला आहे.

सुरेश रैनाच्या पुनरागमनाबाबत बोलताना दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगनं एक महत्वाचं विधान केलंय.

सुरेश रैना जरी चेन्नईत दाखल झाला असला तरी त्याला संघानं प्रथमच करारबद्ध केल्यासारखं आहे. कारण गेल्या मोसमात तो एकही सामना खेळला नव्हता. त्यामुळे तो संघासाठी नवीनच आहे, असं विधान रिकी पाँटिंगनं केलंय.

रैना जरी चेन्नईच्या ताफ्यात खेळत असला तरी त्याचा कोणताही दबाव आम्हाला वाटत नसल्याचं रिकी पाँटिंगनं दाखवून दिलं आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात अटीतटीची लढत पाहायला मिळेल.

"चेन्नईचा संघ आयपीएलमधील एक यशस्वी संघ आहे. नक्कीच त्यांच्याकडे दमदार नेतृत्व आणि तितकेच दमदार खेळाडू देखील आहेत. खेळात सातत्य राखण्यासाठी ते ओळखले जातात. पण गेल्या वर्षीचा सीझन त्यांच्यासाठी निराशाजनक होता. सुरैश रैना त्यांच्या ताफ्यात नव्हता. आता तो संघात आलाय पण तो संघासाठी नवा खेळाडू असल्यासारखंच आहे. कारण तो गेल्या मोसमात एकही सामना खेळलेला नाही", असं रिकी पाँटिंग म्हणाला.

सुरेश रैना गेल्या मोसमात वैयक्तीक कारणामुळे यूएईमधून मायदेशी परतला होता. तो गेल्या मोसमात एकही सामना खेळलेला नाही. गेल्या वर्षी चेन्नईच्या संघाला प्ले-ऑफमध्येही स्थान मिळवता आलं नाही. गुणतालिकेत संघाला ७ व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं.

चेन्नईच्या निराशाजनक कामगिरीनंतर यंदाच्या सीझनमध्ये संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. काही नव्या खेळाडूंसह रैनाचंही पुनरागमन झालं आहे. तर कर्णधार धोनीच्या कामिगीरीकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे.

आयपीएलमधील आकडेवारी पाहायची झाल्यास चेन्नई आणि दिल्ली यांच्यात झालेल्या एकूण लढतींपैकी १३ सामन्यांमध्ये चेन्नईनं विजय प्राप्त केला आहे. तर दिल्लीला ८ वेळा विजय मिळवता आहे. त्यामुळे चेन्नईचं पारडं जड मानलं जात आहे.