IPL 2021, Points Table : महेंद्रसिंग धोनीनं केली विराट कोहलीला मदत; CSKच्या विजयानं RCBच्या नावे विक्रम

IPL 2021, Points Table : चेन्नई सुपर किंग्सकडून ( Chennai Super Kings) २००वा सामना खेळणाऱ्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) सहकाऱ्यांनी विजयाची भेट दिली. पहिल्या सामन्यातील पराभवातून धडा घेताना CSKच्या खेळाडूंनी पंजाब किंग्स ( Punjab Kings) विरुद्घ एकजुटीनं खेळ केला.

दीपक चहरनं ( ४-१३) PBKS च्या तगड्या फलंदाजांना झटपट माघारी पाठवले. शाहरुख खाननं ( ४७) एकाकी झुंज देताना पंजाबला ८ बाद १०६ धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. चेन्नईनं हे लक्ष्य ६ विकेट्स व २६ चेंडू राखून सहज पार केले.

आयपीएलच्या १४व्या पर्वात पहिल्याच सामन्यात २००+ धावा करणाऱ्या पंजाब किंग्सच्या ( Punjab Kings) तगड्या फलंदाजांनी शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) दीपक चहर ( Deepak Chahar) याच्यासमोर शरणागती पत्करली.

रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) नेहमीप्रमाणे क्षेत्ररक्षणात आपली कमाल दाखवताना PBKSचा कर्णधार लोकेश राहुलला ( KL Rahul) धावबाद केलं अन् युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचाही अफलातून झेल टिपला. महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) पहिल्या ७ षटकांत चहरकडून चार षटकं फेकून घेतली आणि त्याचा फायदा झाला. पंजाबचा निम्मा संघ पहिल्या सात षटकांत माघारी परतला. PBKSच्या शाहरुख खाननं ( Shahrukh Khan) एकट्यानं कडवी झुंज दिली.

दीपक चहरनं ४ षटकांत १३ धावांत ४ विकेट्स घेतल्या आणि त्यात १ निर्धाव षटकही टाकलं. २६ धावांवर पाच फलंदाज माघारी परतल्यानंतर पंजाब किंग्ससाठी झाय रिचर्डसन व शाहरुख खान यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ३१ धावा जोडल्या. पण, मोईन अलीनं त्याच्या पहिल्याच षटकात रिचर्डसनचा ( १५) त्रिफळा उडवला. शाहरुख अखेरपर्यंत खिंड लढवत राहिला. त्यानं ३६ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४७ धावा केल्या. पंजाबला २० षटकांत ८ बाद १०६ धावांवर समाधान मानावे लागले.

माफक लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईचे फलंदाजही चाचपडताना दिसले. गोलंदाजांसाठी पोषक खेळपट्टीवर पंजाबचे गोलंदाजही टिच्चून मारा करत होते. ऋतुराज गायकवाड ( ५) पाचव्या षटकात माघारी परतला. अर्षदीप सिंहनं ही विकेट घेतली. त्यानंतर मोईन अलीला प्रमोशन देण्यात आले आणि तोही सावध खेळ करत होता. पण, सेट झाल्यावर त्यानं फटकेबाजीला सुरुवात केली.

मोईन अली व फॅफ यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. फॅफ व अलीनं काही नेत्रदिपक स्ट्रोक खेळले. मोईन ३१ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४६ धावांवर माघारी परतला. सुरेश रैना व अंबाती रायुडू झटपट बाद झाले, परंतु त्याचा सामन्याच्या निकालावर काहीच परिणाम झाला नाही. चेन्नईनं१५.४ षटकांत ४ विकेट्सच्या मोबदल्यात हा सामना जिंकला. फॅफ ३३ चेंडूंत ३६ धावांवर नाबाद राहिला.

चेन्नई सुपर किंग्सनं या विजयासह आयपीएल २०२१मधील गुणाचे खाते उघडले. आयपीएलला सुरुवात होऊन आज एक आठवडा पूर्ण झाला अन् पहिल्या आठवड्यानंतर CSKनं गुणतालिकेत +0.616 सह दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.

पंजाब किंग्सला पराभूत केल्यामुळे पहिल्या आठवड्यात अपराजित राहण्याचा विक्रम विराट कोहलीच्या Royal Challengers Banglore संघाच्या नावावर नोंदवला गेला. चार गुणांसह RCB टॉपवर आहेत.