IPL 2021, MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीचे पाच भारी विक्रम, कर्णधार म्हणून अनोखे द्विशतक साजरे करण्याची संधी!

MS Dhoni's five best IPL records इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वासाठी चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) संघ सज्ज झाला आहे. गतवर्षी यूएईत झालेल्या आयपीएल २०२०तील निराशाजनक कामगिरीला मागे सोडून महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली पुन्हा उभारी घेण्याचा निर्धार CSKनं बांधला आहे.

गतवर्षी आयपीएलच्या शेवटच्या सामन्यात धोनीला हा तुझा पिवळ्या जर्सीतील अखेरचा सामना आहे का, असे विचारण्यात आले होते आणि त्यानं Definitely Not असे दिलेले उत्तर सोशल मीडियावर ट्रेंड झाले होते. आयपीएल २०२१ लिलावातही CSKचे सदस्य 'Definitely Not' हा संदेश असलेले टी शर्ट घालून आले होते.

महेंद्रसिंग धोनीचं नेतृत्व अन् कामगिरी या दोन्ही गोष्टींवर यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वांचे लक्ष असणार आहे. पण, मागील अनेक वर्षांत धोनीनं आयपीएलमध्ये नावावर केलेले विक्रम मोडणे कुणालाही शक्य नाही. १० एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सच्या आयपीएल २०२१मधील प्रवासाला सुरुवात होईल.

आयपीएलमध्ये सर्वाधिक २१६ षटकार मारण्याचा भारतीय फलंदाजाचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. त्यानंतर रोहित शर्मा ( २१३), विराट कोहली ( २०१), सुरेश रैना ( १९४) व रॉबिन उथप्पा ( १६३) यांचा क्रमांक येतो.

यंदाच्या आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून २०० वा सामना खेळण्याचा पराक्रम धोनी करणार आहे आणि असा विक्रम करणारा तो पहिलाच कर्णधार ठरेल. धोनीनं कर्णधार म्हणून १८८ सामन्यांत ११० विजय मिळवले आहेत. त्यानंतर गौतम गंभीर १२९ सामने ( ७१ विजय व ५७ पराभव), विराट कोहली १२५ सामने ( ५५ विजय व ६३ पराभव), रोहित शर्मा ११६ सामने ( ६८ विजय व ४४ पराभव), अॅडम गिलख्रिस्ट ७४ सामने ( ३५ विजय व ३९ पराभव) यांचा क्रमांक येतो.

यष्टींमागेही धोनीची कमाल पाहायला मिळते. त्यानं आतापर्यंत २०४ सामन्यांत १४८ बळी ( १०९ स्टम्पिंग व ३९ कॅच) टिपले आहेत. दिनेश कार्तिक ( १४०), रॉबिन उथप्पा ( ९०), पार्थिव पटेल ( ८१) व वृद्धीमान ( ७६) हे अव्वल पाच यष्टिरक्षक आहेत.

धोनीनं सर्वाधिक ८ वेळा आयपीएल फायनल खेळली आहे. त्यानं चेन्नई सुपर किंग्सकडून ८, तर पुणे सुपर जायंट्सकडून १ वेळा फायनल खेळली आहे. त्यानंतर सुरेश रैना ( ८) व रोहित शर्मा ( ६) असा क्रमांक येतो.

आयपीएलमध्ये १००+ सामने जिंकणाऱ्या पहिल्या कर्णधाराचा मान धोनीनंच पटकावला आहे. त्यानं ११० सामने जिंकले आहेत. गौतम गंभीर ७१, रोहित शर्मा ६८ आणि विराट कोहली ५५ विजयासह अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.