आयपीएलच्या यंदाच्या सीझनचा सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण ठरणार? दिग्गज क्रिकेटपटूनं केली भविष्यवाणी

आयपीएलचं १४ वं सीझन सुरू आहे आणि जवळपास सर्वच सामने अटीतटीचे ठरताना दिसत आहेत. पण यंदाच्या सीझनचा सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण ठरणार याची भविष्यवाणी एका माजी क्रिकेटपटूनं केलीय. जाणून घेऊयात...

आयपीएलच्या यंदाच्या सीझनचे आतापर्यंत ११ सामने झाले आहेत आणि जवळपास प्रत्येक सामना रोमांचक ठरला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या सीझनमध्ये परदेशी खेळाडूंपेक्षा भारतीय खेळाडूंचाच बोलबाला पाहायला मिळत आहे.

आयपीएलमध्ये स्पर्धेच्या शेवटी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्याला पर्पल कॅप देऊन सन्मान करण्याची प्रथा आहे.

यंदाच्या आयपीएल स्पर्धेला आता कुठे सुरू झालीय आणि इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण ठरेल याची भविष्यवाणीच करुन टाकली आहे.

इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन आयपीएलचे चाहते आहेत आणि प्रत्येक सामन्यावर त्यांची नजर असते. यंदाच्या आयपीएलमध्ये मायकल वॉन यांचं ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू धडाकेबाज खेळाडू ग्लेन मॅक्सवेल यानं लक्ष वेधून घेतलं आहे.

ग्लेन मॅक्सवेल याच्यासाठी आयपीएलचं गेलं सीझन खूप वाईट ठरलं होतं. पण यंदाच्या सीझनमध्ये तो आरसीबीच्या संघात दाखल झालाय आणि तुफान फॉर्मात आला आहे.

कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात वरुण चक्रवर्थीनं विराट कोहली आणि पाटिदार याला स्वस्तात बाद केल्यानंतर आरसीबीचा संघ बॅकफूटवर आला होता. पण ग्लेन मॅक्सवेलनं तुफान फटकेबाजी करत ७८ धावांची खणखणीत खेळी साकारली होती.

ग्लेन मॅक्सवेलच्या याच खेळीवर मायकल वॉन यांनी मोठं विधान केलं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये ग्लेन मॅक्सवेल सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरेल, अशी भविष्यवाणी वॉन यांनी केलीय.

मायकल वॉन यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी मॅक्सवेलचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. "मॅक्सवेलची फलंदाजी प्रेमात पाडणारी आहे. यंदाच्या सीझन शेवटी तो सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरू शकतो. विराट कोहली आणि डीव्हिलियर्सची सोबत लाभल्यानं मॅक्सवेल तुफान फॉर्मात आलाय. या तिघांमुळे आरसीबीचा संघ मजबूत झालेला दिसतोय", असं वॉन यांनी म्हटलं आहे.

Read in English