IPL 2021 : मुंबई इंडियन्सनं रिलीज केल्यानंतर लसिथ मलिंगानं घेतला मोठा निर्णय; समोर आलं खरं कारण!

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. २०२०त यूएईत आयपीएलचे सामने खेळवल्यानंतर यंदा ही लीग भारतातच खेळवण्याच्या हालचाली BCCIनं सुरु केल्या आहेत.

२०२१च्या आयपीएलसाठी फ्रँचायझींना त्यांच्या ताफ्यात थोडीफार बदल करण्याची संधी BCCIनं दिली आहे. त्यानुसार सर्व फ्रँचायझींनी आपापल्या ताफ्यातील काही खेळाडूंना रिलीज केले आणि नव्या खेळाडूंसाठी जागा रिक्त केली आहे. पुढील महिन्यात आयपीएल २०२१साठी मिनी ऑक्शन होणार आहे.

BCCIनं दिलेल्या डेड लाईननुसार मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) बुधवारी लसिथ मलिंगासह ( Lasith Malinga) त्यांच्या सहा खेळाडूंना रिलीज केले आहे. मुंबई इंडियन्सच्या ( MI) या निर्णयानंतर मलिंगानंही मोठा निर्णय घेतला.

मुंबई इंडियन्सनं ( MI) बुधवारी लसिथ मलिंगा, नाथन कुल्टर नाइल, जेम्स पॅटिन्सन, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल मॅक्लेनघन, प्रिंस बलवंत सिंह, दिग्विजय देशमुख या खेळाडूंना रिलीज केले.

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, क्रु णाल पंड्या, अनुकूल रॉय, इशान किशन, क्विंटन डी कॉक आदित्य तारे, धवल कुलकर्णी, जयंत यादव, क्रि स लिन, मोहसिन खान आणि अनमोलप्रीतसिंग यांना ताफ्यात कायम राखले आहे.

मुंबई इंडियन्सच्या या निर्णयानंतर श्रीलंकेचा माजी कर्णधार मलिंगानं फ्रँचायझी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम मलिंगाच्या नावावर आहे आणि त्यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच निवृत्तीचा निर्णय मुंबई इंडियन्सला कळवला होता, असे मुंबई इंडियन्सनं सांगितले.

मलिंगानं यापूर्वीच आंतरराष्ट्रीय कसोटी व वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मागील वर्षी त्यानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु कोरोनामुळे ऑस्ट्रेलियात होणारा वर्ल्ड कप रद्द करण्यात आला.

''कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर फ्रँचायझी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मला वाटते. कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेली परिस्थिती आणि प्रवासावरील बंदी यामुळे सर्वकाही अवघड झाले होते. त्यामुळे पुढील वर्षीही फ्रँचायझी क्रिकेटमध्ये खेळणे मला शक्य होणारे नव्हते आणि त्यामुळे हा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे,''असे मलिंगा म्हणाला.

''मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटसोबतची मी चर्चा केली. त्यांनी माझ्या निर्णयाला पाठींबा दिला आणि मला समजून घेतले,''असेही मलिंगाने स्पष्ट केले. मलिंगानं १२२ आयपीएल सामन्यांत १७० विकेट्स घेतल्या आहेत. १३ धावांत ५ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20त एका सामन्यात पाच विकेट्स घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे.

तो पुढे म्हणाला,''मुंबई इंडियन्सनं मला कधीच कुटुंबीयांची कमी जाणवू दिली नाही. प्रत्येक परिस्थितीत त्यांच्याकडून मला १०० टक्के पाठींबा मिळाला. या संघासोबतच्या अनेक संस्मरणीय आठवणी आहेत.''