IPL 2021 : टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजाला लॉटरी, माजी विजेत्यांनी केलं करारबद्ध

इंडियन प्रीमिअर लीगमधून आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंनी माघार घेतली आहे. त्यामुळे फ्रँचायझींची डोकेदुखी वाढली आहे. पण, इंग्लंडच्या खेळाडूंना लॉटरी लागली आहे. IPL 2021

सततच्या बायो बबलला कंटाळून ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल मार्श ( Mitchell Marsh) यानं इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातून ( IPL 2021) माघार घेतली आहे. त्यानं हा निर्णय BCCI आणि सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघालाही कळवला आहे. माजी विजेत्या हैदराबाद संघासाठी ( SRH) हा मोठा धक्का म्हणाला लागेल. यूएईत गतवर्षी झालेल्या आयपीएल २०२०मध्ये मार्शला दुखापतीमुळे स्पर्धा सोडावी लागली होती.

आयपीएलच्या नियमानुसार मार्शला ७ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे आणि त्यानंतर ५० दिवस त्याला या लीगमध्ये खेळावे लागेल. २०२०च्या लिलावात २ कोटींत मार्शला हैदराबादनं करारबद्ध केलं होतं. पण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) विरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली आणि तो माघारी परतला. त्याच्या जागी जेसन होल्डरला ताफ्यात घेतले होते.

त्या दुखापतीतून सावरत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू न्यूझीलंडमध्ये नुकत्याच झालेल्या ट्वेंटी-२० मालिकेत खेळला होता आणि त्यानंतर बिग बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉचर्स संघाकडून खेळला होता. मागील १० वर्षांत मार्श केवळ २१ आयपीएल सामने खेळला आहे. त्यानं डेक्कन चार्जर्स व पुणे वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं.

त्याला रिप्लेसमेंट म्हणून सनरायझर्स हैदराबाद संघानं इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय ( Jason Roy) याला करारबद्ध केलं आहे. भारताविरुद्धच्या वन डे मालिकेत रॉयनं दमदार कामगिरी केली आणि त्यामुळेच SRHनं त्याला करारबद्ध केलं.

जेसन रॉयनं पहिल्या वन डेत ४६ आणि दुसऱ्या वन डेत ५५ धावा केल्या. त्यानं संघाला चांगली सुरूवात करून देताना विजयासाठी पाया रचला होता, परंतु इंग्लंडला मालिका १-२ अशी गमवावी लागली.

जेसन रॉयनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ४३ सामन्यांत १०३४ धावा केल्या आहेत आणि त्याच्या नावावर पाच अर्धशतकं आहेत. रॉय आणि जॉनी बेअरस्टो ही जोडी SRHसाठी सलामीला खेळू शतके.