IPL 2021, CSK in Final, MS Dhoni : कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या 'दोन' निर्णयांनी बाजी पलटवली, चेन्नई सुपर किंग्सनं फायनल गाठली

IPL 2021, Chennai Super Kings beat Delhi Capitals in Qualifier 1 and enter Final : जुनं ते सोनं, हे आज अनेकांना पुन्हा एकदा पटलं असेल. ४० वर्षीय महेंद्रसिंग धोनीची ( MS Dhoni) आजची खेळी त्याची प्रचिती देणारी ठरली.

IPL 2021, Chennai Super Kings beat Delhi Capitals in Qualifier 1 and enter Final : जुनं ते सोनं, हे आज अनेकांना पुन्हा एकदा पटलं असेल. ४० वर्षीय महेंद्रसिंग धोनीची ( MS Dhoni) आजची खेळी त्याची प्रचिती देणारी ठरली. चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) क्वालिफायर १ च्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर ( DC) ४ विकेट्स राखून विजय मिळवताना अंतिम फेरीत प्रवेश केला.

दिल्लीच्या ५ बाद १७२ धावांच्या प्रत्युत्तरात ऋतुराज गायकवाड व रॉबीन उथप्पा यांनी ११० धावांची भागीदारी करताना CSKच्या विजयाचा पाया रचला होता, पण दिल्लीच्या क्षेत्ररक्षकांनी सामन्याला कलाटणी देत CSKचं टेंशन वाढवलं होतं. यावेळी कॅप्टन कूल खरंच कूल राहिला आणि दिल्लीच्या हातून सामना अलगद खेचून नेला.

धोनीनं विजयी चौकार खेचून चेन्नईला ९व्यांदा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. ( CSK have reached their 9th IPL final in history). या सामन्यात धोनीचे दोन निर्णय अत्यंत महत्त्वाचे ठरले आणि CSKनं त्यामुळेच विजय मिळवला. जाणून घेऊया ते निर्णय कोणते.

प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्ससाठी पृथ्वी शॉ यानं ३४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा केल्या. त्यानंतर हेटमायर व रिषभ यांची दमदार खेळ केला. शिमरोन हेटमारनं ३७ धावा केल्या आणि रिषभ पंत ३५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५१ धावांवर नाबाद राहिला अन् दिल्लीनं ५ बाद १७२ धावा केल्या.

फॅफ ड्यू प्लेसिस ( १) अपयशी ठरल्यानंतर ऋतुराज गायकवाड व रॉबीन उथप्प यांनी दमदार खेळ केला. सुरेश रैनाच्या जागी संधी मिळालेल्या रॉबीननं धडाकेबाज खेळी करताना दिल्लीच्या गोलंदाजांना धारेवर धरले. त्यानं ऋतुराजसह दुसऱ्या विकेटसाठी ११० धावा जोडल्या.

रॉबीननं ४४ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारासह ६३ धावा केल्या. शार्दूल ठाकूरला आज बढती मिळाली, पण तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. अंबाती रायुडूही भोपळा न फोडताच धावबाद होऊन माघारी परतला. सलग तीन धक्के बसल्यानं चेन्नई बॅकफूटवर गेले. ऋतुराज एक बाजू सांभाळून खेळत होता.

CSK ला अखेरच्या पाच षटकांत ५२ धावांची गरज असताना मोईन अली व ऋतुराज ही जोडी खेळपट्टीवर होती. १९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलनं अप्रतिम झेल घेत ऋतुराजला माघारी पाठवले. ऋतुराजनं ५० चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ७० धावा केल्या.

रवींद्र जडेजा मैदानावर येणं अपेक्षित असताना महेंद्रसिंग धोनी आला अन् दुसऱ्याच चेंडूवर षटकार खेचला. दीपक चहर शिट्या वाजवताना आणि साक्षी धोनी जल्लोष करताना दिसले. चेन्नईला अखेरच्या षटकात १३ धावा हव्या होत्या. टॉम कुरननं टाकलेला स्लोव्हर चेंडू मोईन अलीनं ( १६) भिरकावला, परंतु सीमारेषेवर कागिसो रबाडानं तो टिपून चेन्नईला धक्का दिला.

पुढील दोन चेंडूवर धोनीनं चौकार खेचले. चौथा चेंडू Wide फेकल्यानं ३ चेंडू ४ धावा असा सामना अटीतटीचा आला. धोनीनं चौकार मारून चेन्नईचा विजय पक्का केला अन् अंतिम फेरीत प्रवेश केला. चेन्नईनं ४ विकेट्स राखून हा सामना जिंकला.

आजच्या महत्त्वाच्या सामन्यात आऊट ऑफ फॉर्म ठरलेल्या रॉबीनला सुरेश रैनाच्या जागी संधी देणं अन् संघ अडचणीत असताना जडेजाच्या जागी स्वतः फलंदाजीला उतरणं, धोनीच्या या दोन निर्णयानं चेन्नईला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.