IPL 2021: एक अतरंगी...तर दुसरा सतरंगी...मॅक्सवेल, डीव्हिलियर्सनं KKRला मजबूत धुतलं!

IPL 2021: आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात सामना सुरू आहे. आरसीबीकडून दोन धडाकेबाज फलंदाजांनी चेन्नईच्या मैदानात वादळ निर्माण केलं. (ipl 2021 AB de Villiers and Glenn Maxwell power RCB to 204 against KKR)

आयपीएलमध्ये रविवारच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (RCB) कोलकाता नाइट रायडर्सच्या (KKR) गोलंदाजांचा समाचार घेत २०५ धावांचं आव्हान दिलं आहे. पण आरसीबीची सुरुवात निराशाजनक झाली होती. दुसऱ्याच षटकात दोन विकेट्स पडल्या होत्या.

वरुण चक्रवर्थीच्या गोलंदाजीवर विराट कोहली (५) आणि रजत पाटिदार (२) धावांवर बाद झाले होते. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलनं आरसीबीचा डाव सांभाळून संघाला सामन्यात पुनरागमन करुन दिलं.

मैदानात अतरंगी फटकेबाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मॅक्सवेलनं कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मॅक्सवेलनं सामन्यात सर्वाधिक ७८ धावांची खेळी साकारली.

मॅक्सवेलनं मैदानाच्या कानाकोपऱ्यांमध्ये फटकेबाजी करत ४९ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्यानं ७८ धावांची खेळी साकारली.

देवदत्त पडिक्कल बाद झाल्यानंतर मैदानात एबी डीव्हिलियर्स आला आणि एका 'अतरंगी' खेळाडूला मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात षटकारांची उधळण करणाऱ्या 'सतरंगी' खेळाडूची साथ मिळाली.

ग्लेन मॅक्सवेल आणि डीव्हिलियर्सनं केकेआरच्या गोलंदाजांना नेस्तनाभूत करत अर्धशतकी भागीदारी रचली. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर डीव्हिलियर्सनं संघाची कमान सांभाळत कोणताही दबाव निर्माण न होऊ देता आपला नैसर्गिक खेळ केला.

सामन्याच्या अखेरच्या पाच षटकांमध्ये एबी डीव्हिलियर्स नावाचं वादळ पाहायला मिळालं. डीव्हिलियर्नं जबरदस्त फटकेबाजी करत आरसीबीच्या धावसंख्येला दोनशे पार नेलं.

डीव्हिलियर्सनं अवघ्या ३४ चेंडूत खणखणीत ९ चौकार आणि तीन उत्तुंग षटकांच्या सहाय्यानं नाबाद ७६ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली.

डीव्हिलियर्स आणि मॅक्सवेलच्या तडफदार खेळीच्या जोरावर आरसीबीला २० षटकांच्या अखेरीस ४ बाद २०४ धावा करता आल्या.