पाकिस्तानच्या तीन खेळाडूंच्या नावावर IPLची ट्रॉफी; विराट कोहली, ख्रिस गेल अन् ABDची पाटी अजून कोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 04:06 PM2021-09-14T16:06:13+5:302021-09-14T16:08:06+5:30

विराट कोहली ( Virat Kohli) च्या नावावर अद्याप एकही इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL ) जेतेपद नाही. पण, आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघानं ७ पैकी ५ सामने जिंकून गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे आणि दुसऱ्या टप्प्यात तीन विजय मिळवून त्याला प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे.

२००८पासून तो RCBचा सदस्य आहे आणि त्याला एकदाही संघाला आयपीएल जेतेपद जिंकून देता आलेले नाही. त्यानं आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला आहे. त्याच्या नावावर ६०७६ धावा आहेत आणि त्यात पाच शतकं व ४० अर्धशतकांचा समावेश आहे. कोहली व्यतिरिक्त एबी डिव्हिलियर्सनं ५०५६ धावा, ख्रिस गेलनं ४९५० धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे या तीन दिग्गजांच्या नावावर एकही आयपीएल जेतेपद नाही.

पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये आता बंदी असली तरी २००८च्या पर्वात पाकिस्तानी खेळाडू खेळले होते. सोहेल तन्वीर, कामरान अकमल आणि युनूस खान हे २००८ साली राजस्थान रॉयल्स संघाचे सदस्य होते आणि पहिलेच पर्व राजस्थान रॉयल्सनं जिंकले होते. सोहेलनं त्या पर्वात ११ सामन्यांत सर्वाधिक २२ विकेट्स घेतल्या होत्या. १४ धावांत ६ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी, मोहम्मद आसिफ, शोएब मलिक, मोहम्मद हफीज, सलमान बट, शोएब अख्तर, उमर गुल आणि मिसबाह उल हक हेही २००८च्या आयपीएलचे सदस्य होते. पण, २००८च्या मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घातली गेली.

आयपीएलच्या इतिहासात ६ संघांनी किमान एक जेतेपद जिंकले आहे. कोची टस्कर्सला एकच पर्व खेळण्याची संधी मिळाली. चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स यांच्यावरील बंदीनंतर पुणे व गुजरात संघ २०१६ व २०१७च्या पर्वात खेळले होते. मुंबई इंडियन्सनं सर्वाधिक पाच वेळा जेतेपद पटकावले आहे.

Read in English