IPL 2020 : बायो बबल म्हणजे काय? ज्याची शिखर धवनने बिग बॉसच्या घराशी केलीय तुलना

भारतात सध्या कोरोनाचा कहर सुरू असल्याने आयपीएल यावर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवली जात आहे. यंदाचा आयपीएलचा हंगाम १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनचे कडक नियम यांचा सामना करत आयपीएलच्या १३ व्या हंगामाला येत्या १९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. भारतात सध्या कोरोनाचा कहर सुरू असल्याने आयपीएल यावर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवली जात आहे.

विशेष बाब म्हणजे स्पर्धेदरम्यान खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून बायो बबल व्यवस्था करण्यात आली आहेत. तसेच त्यासाठी कडक नियमावली सक्तीने लागू करण्यात आली आहे. दरम्यान, या बायो बबल व्यवस्थेची तुलना शिखर धवनने बिग बॉसच्या घराशी केली आहे. आज आपण जाणून घेऊया की बायो बबल म्हणजे काय आणि धवनने त्याची तुलना बिग बॉसच्या घराशी का केली आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना बायो बबल (जैव सुरक्षित) वातावरणामध्ये राहावे लागेल. यामध्ये कुठल्याही प्रकारची कुचराई चालणार नाही, अशा परिस्थितीत खेळाडूंचा संपूर्ण स्पर्धेदरम्यान बाहेरील जगाशी संपर्क राहणार नाही.

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा धडाकेबाज फलंजा शिखर धवनने बायो बबल व्यवस्थेबाबत सहमती दर्शवली आहे. सोबतच या व्यवस्थेतची तुलना बिग बॉसमधील घराशी केली आहे. बिग बॉसमधील घरामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना सुमारे तीन महिने राहावे लागते.

कोरोनामुक्त राहता यावे यासाठी यंदाच्या आयपीएलमध्ये खेळाडूंचे जग हे हॉटेल, सरावाचे मैदान आणि आयपीएल लढती एवढ्यापुरतेच मर्यादित राहणार आहे. तसेच आयपीएलचे सामनेही रिकाम्या स्टेडियममध्ये घेण्यात येतील.

धवन म्हणाला की, बायो बबल ही प्रत्येकासाठी नवी व्यवस्था आहे. आव्हानापेक्षा मी त्याच्या प्रत्येक पैलूकडे सुधारणा करण्याची संधी म्हणून पाहत आहे. आता प्रत्येक खेळाडू या व्यवस्थेशी कशा प्रकारे जुळवून घेतो. त्याच्यावर त्याचे यश अवलंबून असेल.

३४ वर्षीय धवन जानेवारीनंतर प्रथमच क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ आपल्या अभियानाची सुरुवात किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या लढतीमधून करेल.

कोरोना काळामध्ये बायो बबल या व्यवस्थेकडे एक सकारात्मक समाधान म्हणून पाहिजे जात आहे. हल्लीच वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेमध्ये खेळाडूंसाठी बायो बबल व्यवस्था लागू करण्यात आली होती. मार्च महिन्यामध्ये जागतिक लॉकडाऊनची सुरुवात झाल्यानंतर इंग्लंडमध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले गेले होते. त्यावेळी बायो सिक्योर फॉर्म्युला लागू करण्यात आला होता. त्यालाच बायो बबल व्यवस्था म्हणतात.