IPL 2020 : विराट कोहली ते एबीडी... जाणून घ्या, कोणाला किती 'पगार' देते RCB!

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला आतापर्यंत एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही. RCBनं केवळ दोन वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आणि त्यांना 2009मध्ये डेक्कन चार्जर्स, तर 2016मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला. यंदा आयपीएलच्या तोंडावर RCBनं त्यांच्या लोगोमध्ये बदल केला. पण, हा बदल त्यांना लाभदायी ठरतो का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. आयपीएल 2020च्या लिलावात RCBनं 13 खेळाडूंना कायम राखले. RCB त्यांच्या खेळाडूंना किती पगार देत आहेत, हे माहीत आहे का?

केन रिचर्डसन - चार वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. RCBनं त्याच्यासाठी 4 कोटी मोजले.

डेल स्टेन - दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज गोलंदाजानं 2019च्या आयपीएलमध्ये अनपेक्षित पुनरागमन केले. नॅथन कोल्टर-नीलच्या जागी त्याला करारबद्ध केले. 2020च्या लिलावात त्याच्यासाठी RCBनं 2 कोटी मोजले.

नवदीप सैनी - दिल्ली कॅपिटल्सच्या या माजी गोलंदाजानं 2018मध्ये RCBचा हात पकडला. RCBनं त्याला 3 कोटींत आपलेसे केले. 2019मध्ये त्यानं आयपीएलचा पहिला सामना खेळला.

मोहम्मद सिराज - आयपीएलच्या 2018च्या लिलावात RCBनं जलदगती गोलंदाजासाठी 2.6 कोटी मोजले.

उमेश यादव - टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघाचा सदस्य नसूनही RCBनं त्याला 2018 च्या लिलावात खरेदी केलं. त्याच्यासाठी RCBनं 4.2 कोटी मोजले.

पवन नेगी - राईट टू मॅच कार्ड येथेही वापरून RCBनं त्याला मुंबई इंडियन्सकडून 1 कोटीत आपल्या ताफ्यात पुन्हा घेतले.

युजवेंद्र चहल - 2014मध्ये चहल RCB संघात दाखल झाला. 2020च्या लिलावात RCBनं त्याला रिलीज केलं होतं, परंतु राईट टू मॅच नियमांतर्गत त्याला 6 कोटींत पुन्हा आपलेसे केले.

वॉशिंग्टन सुंदर - रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघासाठी दमदार खेळी करूनही सुंदरला आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळाले नाही. पण, 2018च्या लिलावात RCBनं त्याला 3.2 कोटींत आपल्या ताफ्यात घेतले आणि आता तो टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघाचा नियमित सदस्य आहे.

इसूरू उदाना - श्रीलंकेच्या गोलंदाजासाठी RCBनं 50 लाख रुपये खर्च केले.

पवन देशपांडे - 30 वर्षीय खेळाडूला 2020 लिलावात 20 लाखांच्या मूळ रकमेत खरेदी केलं.

शिवम दुबे - आयपीएल लिलावापूर्वी शिवमनं रणजी करंडक स्पर्धेत सलग पाच षटकार खेचून लक्ष वेधले होते. RCBसह त्याच्यासाठी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांनी प्रयत्न केले. पण, RCBनं त्याला 5 कोटीत आपल्या ताफ्यात घेतले. त्याला केवळ चार सामने खेळण्याची संधी मिळाली.

मोइन अली - इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूला 2018च्या लिलावात 1.7 कोटीत खरेदी केलं. 2019च्या मोसमात मोइननं 11 सामने खेळले.

ख्रिस मॉरिस - आयपीएल 2020च्या लिलावात RCBनं मॉरिससाठी 10 कोटी रुपये मोजले. यंदाच्या मोसमात मॉरिस अनसोल्ड राहिल असं वाटलं होतं, परंतु RCBसह किंग्स इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चुरस रंगली.

गुरकिरत सिंग मान - RCBकडून आयपीएलचे दुसरे सत्र खेळण्यासाठी अष्टपैलू खेळाडू तयार आहे. 2019च्या लिलावात RCBनं त्याच्यासाठी 50 लाख रुपये मोजले. त्यानं गतवर्षी तीन सामन्यांत 98 धावा केल्या.

शाहबाझ अहमद - बंगालच्या अष्टपैलू खेळाडूला RCBनं 20 लाख मूळ किमतीत घेतले. शाहबाझनं 16 ट्वेंटी-20 सामन्यांत 158 धावा आणि 15 विकेट्स घेतल्या.

जोश फिलिप - 22 वर्षीय यष्टिरक्षक आयपीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. RCBनं त्याला 20 लाखांच्या मूळ किमतीत ताफ्यात दाखल करून घेतले.

देवदत्त पडीक्कल - स्थानिक खेळाडू देवदत्तला 2019च्या लिलावात 20 लाखांत RCBनं घेतलं. स्थानिक क्रिकेट गाजवूनही देवदत्तला खेळण्याची संधी मिळाली नाही. यंदाच्या मोसमातही त्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

अ‍ॅरोन फिंच - ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंचसाठी RCBनं 2020च्या लिलावात 4.4 कोटी रुपये मोजले. त्याच्या येण्यानं पार्थिवला मधल्या फळीत खेळावे लागेल.

पार्थिव पटेल - 2018च्या आयपीएल लिलावात RCBनं पार्थिव पटेलसाठी 1.7 कोटी रुपये मोजले. 2020नंतर त्याचा RCB सोबतचा तीन वर्षांचा करार संपुष्टात येईल.

एबी डिव्हिलियर्स - दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार RCBकडून आयपीएलचा 10वा मोसम खेळणार आहे. 2018च्या लिलावात RCBनं कायम राखलेल्या खेळाडूंमध्ये डिव्हिलियर्सचाही समावेश आहे. डिव्हिलियर्ससाठी त्यांनी 11 कोटी रक्कम मोजली.

विराट कोहली - आयपीएल संघमालक RCBनं विराट कोहलीला पहिल्या सत्रापासून संघात कायम राखले आहे. 2018च्या लिलावात RCBनं त्याला 17 कोटी देऊन संघात कायम राखले. कायम राखलेल्या खेळाडूला मिळालेली ही सर्वाधिक रक्कम आहे.