अरे देवा... IPL 2020 सुरू होण्यापूर्वीच माजी विजेत्या संघातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह!

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 13 व्या मोसमासाठीची सर्व तयारी झाली आहे. तारीख ठरली आहे, केंद्र सरकारकडून परवानगीही मिळाली आहे, खेळाडूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे सर्व 8 संघांसाठीच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे.

कोरोना व्हायरसचे संकट लक्षात घेता यूएईला रवाना होण्यापूर्वी आणि तेथे दाखल झाल्यानंतर प्रत्येक खेळाडूची कोरोना चाचणी केली जाणार आहे. खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या बाबतीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) कोणतीही तडजोड करणार नाही, हे स्पष्ट आहे. पण, आयपीएल सुरू व्हायला अवघ्या एका महिन्याचा कालावधी शिल्लक असताना टेंशन वाढवणारे वृत्त समोर आले आहे.

आयपीएल यूएईत खेळवण्यासाठी सरकारकडून मान्यता मिळाल्याची माहिती गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सांगितले. त्यामुळे 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत यूएईत आयपीएल खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बीसीसीआयच्या माहितीनंतर 8 फ्रँचायझींनी खेळाडूंना क्वारंटाईन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पटेल यांनी सांगितले की,''आम्हाला लेखी परवानगी मिळाली आहे.'' यूएईत होणाऱ्या आयपीएलसाठी 20 ऑगस्टला बहुतेक संघ रवाना होणार आहेत.

''फ्रँचायझींनी PCR टेस्ट करून घेणे कधीही चांगले आणि निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन ते यूएईत दाखल होत असतील तर अतीउत्तम. त्यानंतर त्यांना बीसीसीआयच्या SOPनुसार यूएईला रवाना होण्यापूर्वी 24 तासांत दोन कोरोना चाचणी कराव्या लागतील,''असे फ्रँचायझीच्या अधिकाऱ्यानं सांगितले. ते पुढे म्हणाले,''दोन कोरोना चाचणी करणे अनिवार्य असताना काही फ्रँचायझी भारत सोडण्यापूर्वी चार चाचण्या करणार आहेत.''

19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत रंगणाऱ्या लीगमध्ये 10 डबल हेडर सामने ( 3.30 वाजता होतील सामने) खेळवण्यात येतील. आयपीएलच्या लढती दुबई, शाहजाह आणि अबुधाबी येथे होतील. दरम्यान, महिला ट्वेंटी-20 चॅलेंज होणार असून तीन संघांमध्ये चार सामने खेळवण्यात येणार आहेत.

यूएईला रवाना होण्यापूर्वी संघातील प्रत्येक सदस्याची कोरोना चाचणी करण्यात येत आहे आणि त्यात धक्कादायक बाब समोर आली. फ्रँचायझींकडून सर्व खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि व्यवस्थापकीय सदस्यांची चाचणी केली जात आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार यूएईला रवाना होण्यापूर्वी दोन वेळा चाचणी केली जाणार आहे.

आयपीएलसाठी रवाना होण्यापूर्वी माजी विजेत्या राजस्थान रॉयल्स संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक दिशांत याग्निक यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

दिशांत हे सध्या उदयपूर येथे आहेत आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केले असून 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला दिला गेला आहे. 14 दिवसांनंतर दिशांत यांची पुन्हा दोन वेळा चाचणी केली जाईल. दोन टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना यूएईला जाता येईल.

राजस्थान फ्रँचायझींकडून दिशांतच्या संपर्कात आलेल्या सर्वांना आयसोलेट आणि चाचणी करून घेण्याची विनंती करण्यात आली आहे. सुखद बाब म्हणजे राजस्थान रॉयल्सचा कोणताही खेळाडू मागील दहा दिवसांत दिशांत यांच्या संपर्कात आलेला नाही.

Read in English