IPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्स इथे गमावली सामन्यावरील पकड; डू प्लेसिसचे झेल ठरले टर्निंग पॉईंट

IPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super kings) यांच्यातल्या IPL 2020तील पहिल्या सामन्यात चांगली चुरस पाहायला मिळाली.

पहिल्या चार षटकांत सामना MIच्या पारड्यात होता, पण पाचव्या षटकात दोन्ही सलामीवीर परतले. त्यानंतर सौरभ तिवारीनं खिंड लढवली, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांनी फटकेबाजी केली. पण, पुन्हा CSKनं सामन्यात कमबॅक केले आणि मुंबईला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले.

रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि क्विंटन डी'कॉक ( Q de Kock) यांनी मुंबई इंडियन्सला साजेशी सुरुवात करून दिली. न्यूझीलंड दौऱ्यानंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरलेल्या रोहितनं CSK गोलंदाज दीपक चहर याचं पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून स्वागत केलं.

इतक्या दिवसांनी बॅटवर हात साफ करण्याची संधी रोहित या सामन्यात सोडणार नाही, त्याची फटकेबाजी पाहून असेच वाटत होते. पण, महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) चतुर नेतृत्वानं सामन्यात रंगत आणली. धोनीनं पाचवं षटक पीयूष चावलाला ( Piyush Chawla) पाचारण केलं आणि त्याच्या गुगलीसमोर रोहित फसला. तो सॅम कुरनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. रोहितला 10 चेंडूंत 2 चौकारांसह 12 धावाच करता आल्या.

पुढील षटकात क्विंटनही बाद झाला. यावेळी कुरनच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात तो शेन वॉटसनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. क्विंटनने 20 चेंडूंत 5 चौकारांसह 33 धावा केल्या.

मुंबई इंडियन्सचे ( MI) दोन्ही सलामीवीर 48 धावांत माघारी परतल्यानंतर CSK सामन्यात कमबॅक करण्याच्या तयारीत होते, पण, सौरभ तिवारी (Saurabh Tiwary) आणि सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी MI चा डाव सावरला. मुंबईने पहिल्या 10 षटकांत 2 बाद 86 धावा केल्या. पण, 11 व्या षटकात MIला तिसरा धक्का बसला.

हार्दिक पांड्याही ( Hardik Pandya) बऱ्याच कालावधीनंतर मैदानावर उतरला. त्याने सुरुवातीला फटकेबाजी केली. दुसऱ्या बाजूने सौरभ तिवारी फटकेबाजी करत होता.

पण, 15व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रवींद्र जडेजानं त्याला बाद केलं. फॅफ ड्यू प्लेसिसनं ( Faf du Plessis ) सीमारेषेवर सुरेख झेल टिपला. तिवारी 31 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार मारून 42 धावांत बाद झाला.

त्याच षटकात फॅफनं आणखी एक सुरेख झेल टिपून हार्दिक पांड्याला माघारी पाठवले. हार्दिकने 14 धावा केल्या. MIच्या 15 षटकांत 5 बा 126 धावा झाल्या होत्या.

कृणाल पांड्या ( Krunal Pandya) आणि किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) हे मोठी खेळी करतील अशी अपेक्षा होती. पण, चेन्नईच्या गोलंदाजांनी त्यांना यश मिळवू दिले नाही.

जेम्स पॅटिन्सनही ( 11) लगेच बाद झाला. मुंबई इंडियन्सला ( MI) 20 षटकांत 9 बाद 162 धावांवर समाधान मानावे लागले. लुंगी एनगिडीनं 38 धावांत 3 विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजानं ( 42/2) दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या.