IPL 2020 : आयपीएलमध्ये सहाव्यांदा लागले सलग चार षटकार

- ललित झांबरे शारजात (Sharjah) मंगळवारी राजस्थान रॉयल्ससाठी (Rajsthan Royals) जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) केलेल्या वादळी खेळीची चर्चा आहे. 8 चेंडूतच सलग चार षटकारांसह त्याने केलेल्या 27 धावांनी राजस्थान राॕयल्सला दोनशेच्यावर पोहचवले. हीच मोठी धावसंख्या रॉयल्सना चेन्नईवर विजय मिळवून देणारी ठरली. त्यामुळे 6666 अशा सलग चार षटकारांची चर्चा आहे. आयपीएलमध्ये सहाव्यांदा हे घडले आहे आणि त्यात षटकारांचा बादशहा ख्रिस गेलने तीन वेळा हा पराक्रम केला आहे.

1) ख्रिस गेल (केकेआर) - गोलंदाज रवी बोपारा (किंग्ज इलेव्हन) - 2010 - डावातील हे 13 वे षटक होते. त्यात पहिल्या चेंडूवर मनोज तिवारीने एक धाव घेतली आणि मग ख्रिस गेलची बॅट 6, 6, 6, 6, अशी तळपली. त्यानंतर 5 आणि 1 धाव वाईडची मिळाली आणि शेवटच्या चेंडूवर गेलने एक धाव घेतली. यप्रकारे या एकाच षटकात 32 धावा निघाल्या.

2) ख्रिस गेल (आरसीबी) - गोलंदाज राहुल शर्मा (पुणे वॉरियर्स) - 2012 -हे सुध्दा डावातील 13 वेच षटक होते. त्यात पहिल्या चेंडूवर सौरभ तिवारीने एक धाव घेतल्यावर गेलने पुढचे सलग पाच चेंडू षटकारासाठी भिरकावले. याप्रकारे या षटकात 1, 6, 6, 6, 6, 6.अशा 31 धावा निघाल्या.

3) युवराज सिंग (आरसीबी) -.गोलंदाज राहुल शुक्ला (दिल्ली) - 2014 - आंतरराष्ट्रीय सामन्यात एकाच षटकात सहा षटकार लगावल्यावर युवराजसिँगने सात वर्षानंतर पुन्हा तशीच षटकारांची बरसात केली. त्याने 29 चेंडूतच 9 षटकार व एक चौकारासह 68 धावा करताना डावातील शेवटच्या षटकात लागोपाठ चार षटकार लगावले होते. त्याआधी त्याने याच खेळीत इम्रान ताहीरला सलग तीन षटकार लगावले होते.

4) ख्रिस गेल ( किंग्ज,इलेव्हन)- गोलंदाज राशिद खान (हैदराबाद) - 2018 - ख्रिस गेलने तिसऱ्यांदा सलग चार षटकार लगावण्याचा पराक्रम केला. डावातील हे 14 वे षटक होते. त्यात पहिल्या चेंडूवर एक धाव निघाल्यावर स्ट्राईक गेलला मिळाली आणि 6,6,6,6 अशी आतषबाजी बघायला मिळाली. या षटकात 26 धावा निघाल्या.

5) इशान किशन (मुंबई) - गोलंदाज कुलदीप यादव (कोलकाता) - 2018 - डावातील हे चौदावे षटकं होते. दुसऱ्या चेंडूवर रोहित शर्माने एक धाव घेतल्यावर इशान किशनने सलग चार षटकार लगावलै. त्याने या खेळीत 21 चेंडूतच 62 धावा केल्या.

6) जोफ्रा आर्चर (राजस्थान) - गोलंदाज लुंगी एन्गीडी (चेन्नई)- 2020 - जोफ्रा आर्चरने मंगळवारच्या खेळीत चेन्नईच्या लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीची पिसे काढली. त्याला जोफ्रा आर्चरने सलग चार षटकार लगावले. त्यापैकी दोन नोबाॕलवर होते. दोन नोबाॕल असलेल्या चार चेंडूत चार षटकार अशा दोनच वैध चेंडूवर 27 धावा निघाल्या .