IPL: 2020 : सलग दुसऱ्या पराभवानंतरही वॉर्नर बिनधास्त, सांगितलं KKRकडून हरण्यामागचं खरं कारण

हैदराबादच्या संघाला सलग दोन पराभवांचा सामना करावा लागला आहे. मात्र बंगळुरू आणि कोलकातासोबतचे सामने गमावल्यानंतरही हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर काहीसा बिनधास्त असून, त्याने कोलकात्याकडून झालेल्या पराभावाचं कारणही सांगितलं आहे.

वॉर्नर-बेअस्ट्रोसारखे स्फोटक फलंदाज आणि रशिद खान भुवनेश्वर कुमारसारखे भेदक गोलंदाज ताफ्यात असूनही यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघाला सलग दोन पराभवांचा सामना करावा लागला आहे. मात्र बंगळुरू आणि कोलकातासोबतचे सामने गमावल्यानंतरही हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर काहीसा बिनधास्त असून, त्याने कोलकात्याकडून झालेल्या पराभावाचं कारणही सांगितलं आहे.

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या संघाने ३० ते ४० धावा कमी केल्या, असे वॉर्नरने म्हटले आहे. शनिवारी अबुधाबीमध्ये झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला ७ विकेट्सनी पराभूत केले होते.

या लढतीत डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र हैदराबादला या निर्णयानंतर फलंदाजीत फारसा चमत्कार दाखवता आला नाही. हैदराबादचा संघ निर्धारित २० षटकांमध्ये चार विकेट्सच्या मोबदल्यात केवळ १४२ धावाच करण्यात यशस्वी ठरला. मात्र हे आव्हान कोलकात्याच्या संघाने १८ षटकांत तीन विकेट्सच्या मोबदल्यात पार केले होते.

सामन्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्यात वॉर्नरने आपला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्यच होता असे सांगितले. मला वाटतं आमचा निर्णय योग्य होता. आमचे बलस्थान अखेरच्या षटकांमधील गोलंदाजी आहे. या खेळपट्टीवर वेगाने धावा बनवणे सोपे नव्हते. आता मी सामन्याच्या सुरुवातीला जो विचार केला त्याचा मला काहीही पश्चाताप नाही आहे. मी माझा निर्णय योग्य होता, या भूमिकेवर कायम आहे.

मला वाटतं मधल्या चार-पाच षटकांमध्ये आम्ही केवळ २० धावाच केल्या. तिथे आमचा वेळ वाया गेला. जर ३०-४० धावा अधिक बनल्या असत्या, तर चांगले झाले असते. खरंतर या लढतीत मनीष पांडे, वॉर्नर आणि रिद्धिमान साहा यांच्या उपयुक्त खेळींनंतरही हैदराबादला समाधानकारक धावा करता आल्या नव्हत्या.

वॉर्नर म्हणाला की, आम्हाला आमच्या चौकार-षटकार मारण्याच्या टक्केवारीत सुधारणा करावी लागेल. मला वाटते की आमच्या डावात सुमारे ३५ निर्धाव चेंडू होते. ही बाब टी-२० क्रिकेटमध्ये स्वीकारार्ह म्हणता येणार नाही. खासकरून जिथे फलंदाजी करणे सोपे अशा खेळपट्टीवर.

सलग दोन पराभवांमुळे सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतक्त्यामध्ये अखेरच्या स्थानावर आहे. आता सनरायझर्जचा पुढील सामना २९ सप्टेंबर रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अबुधाबी येथे होणार आहे.