IPL 2020च्या लिलावात आठ युवा खेळाडूंसाठी रंगणार चुरस

यशस्वी जैस्वाल ( मुंबई) - मुंबईच्या या खेळाडूनं आपल्या फटकेबाजीनं सर्वांना आकर्षित केलं आहे. विजय हजारे चषक वन डे स्पर्धेत यशस्वीनं 25 षटकारांची आतषबाजी केली आहे. त्यानं झारखंडविरुद्धच्या सामन्यात द्विशतकी खेळी करताना विक्रमाला गवसणी घातली.

आर साई किशोर ( तामिळनाडू) - डावखुऱ्या फिरकीपटूनं तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये आपली छाप पाडली. सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत सर्वाधिक 20 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी 15 विकेट्स या पॉवरप्लेमध्ये घेतल्या आहेत.

प्रियम गर्ग ( उत्तर प्रदेश) - पुढील वर्षी होणाऱ्या 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे नेतृत्व प्रियम गर्गच्या खांद्यावर सोपवण्यात आले आहे. त्यानं देवधर चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 74 धावांची खेळी करताना संघाला विजय मिळवून दिला होता.

इशान पोरेल ( बंगाल) - 140kph च्या वेगानं सातत्यानं मारा करण्याची कला या गोलंदाजाकडे अवगत आहे. 21 वर्षीय या गोलंदाजानं देवधर चषक स्पर्धेत भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करताना 43 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यात यशस्वी जैस्वाल, केदार जाधव व विजय शंकर या खेळाडूंचाही समावेश होता. या स्पर्धेत त्यानं 6 सामन्यांत 25.60च्या सरासरीनं 10 विकेट्स घेतल्या आहेत.

रोहन कदम ( कर्नाटक) - सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 2018-19च्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहन आघाडीवर आहे. त्यानं कर्नाटकला ट्वेंटी-20 स्पर्धेचं जेतेपद पटकावून दिलं. त्यानं 7 डावांत 131.63च्या स्ट्राइक रेटनं 258 धावा चोपल्या. मुंबईविरुद्ध त्यानं 47 चेंडूंत 71 धावा चोपल्या.

रवी बिश्नोई ( राजस्थान ) - आगामी 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत फिरकीपटू बिश्नोईचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला आहे. त्यानं युवा वन डे स्पर्धेत सात सामन्यांत 4.37च्या सरासरीनं 12 विकेट्स गेतल्या आहेत. विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्यानं साजेशी कामगिरी केली आहे.

एम शाहरुख खान ( तामिळनाडू) - तामिळनाडू संघाचा कर्णधार दिनेश कार्तिकनंही या खेळाडूचे कौतुक केले आहे. त्याच्या फलंदाजीनं सर्वांना प्रभावित केले आहे.

विराट सिंग ( झारखंड) - सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्यानं 10 डावांत 57.16च्या सरासरीनं 343 धावा केल्या आहेत.