IND vs SL 1st ODI : लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा मोठा विजय, श्रीलंकेविरुद्ध 'गब्बर अँड टीम'चा विक्रमांचा पाऊस!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 10:54 PM2021-07-18T22:54:19+5:302021-07-18T22:57:25+5:30

India vs Sri Lanka 1st ODI, Live Update, Colombo : पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) आणि इशान किशन ( Ishan Kishan) या युवा फलंदाजांनी श्रीलंकेची जिरवली. कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात शिखर धवन ( Shikhar Dhawan) यानंही संयमानं खेळ करताना अनेक विक्रमांचीही नोंद करत भारताला ७ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. भारतानं या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

India vs Sri Lanka 1st ODI, Live Update, Colombo : पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) आणि इशान किशन ( Ishan Kishan) या युवा फलंदाजांनी श्रीलंकेची जिरवली. कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात शिखर धवन ( Shikhar Dhawan) यानंही संयमानं खेळ करताना अनेक विक्रमांचीही नोंद करत भारताला ७ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. भारतानं या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

चरिथा असालंका ( ३८), कर्णधार दानूश शनाका ( ३९), चमिका करुणारत्ने ( ४३*) व दुश्मंथा चमिरा ( १३) यांनी संघाला ९ बाद २६२ धावांपर्यंत मजल मारून दिली. दीपक चहरनं ३७ धावांत २ बळी टिपले. कुलदीपनेही ४८ धावांत २ विकेट घेतल्या आणि युजवेंद्र चहलनेही ५२ धावांत २ फलंदाज बाद केले.

लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वीनं पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळ केला. पृथ्वीनं २४ चेंडूंत ९ चौकारासह ४३ धावा केल्या. इशान किशनने वन डे पदार्पणात अर्धशतक झळकावले. त्यानं ४२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ५९ धावा केल्या.

शिखर धवननं ९५ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह नाबाद ८६ धावा केल्या. सूर्यकुमार यादव २० चेंडूंत ३१ धावांवर नाबाद राहिला. भारतानं ३६.४ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य पार केले. टीम इंडियानं ७ विकेट्स व ८० चेंडू राखून विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

भारतानं ८० चेंडू राखून हा सामना जिंकला. चेंडू हातचे राखून टीम इंडियानं मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला. याआधी २०१२मध्ये भारतानं श्रीलंकेविरुद्धच ८० चेंडू राखून विजय मिळवला होता. श्रीलंकेच्या ४ बाद ३२० धावांचे लक्ष्य टीम इंडियानं ३६.४ षटकांत ३ बाद ३२१ धावांसह पार केले होते.

श्रीलंकेनेही या सामन्यात २६२ धावा करून १० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. एकाचेही अर्धशतक नाही आणि एकाही जोडीची अर्धशतकी भागीदारी नसतानाही संघानं केलेल्या या सर्वोत्तम धावा ठरल्या. यापूर्वी ऑस्ट्रेलियानं २००१मध्ये सिडनीत ९ बाद २५३ धावा केल्या होत्या.

पृथ्वी शॉनं पहिल्या विकेटसाठी शिखर धवन ५८ धावांची भागीदारी केली. यात पृथ्वीनं २४ चेंडूंत ९ चौकारासह ४३ धावा केल्या. वन डे क्रिकेटमध्ये पहिल्या २० चेंडूंत पृथ्वीनं ३९ धावा चोपल्या. २००८मध्ये वीरूनं हाँगकाँगविरुद्ध ४१ धावा कुटल्या होत्या आणि त्यानंतर भारतीय सलामीवीरानं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

इशाननं वन डे व ट्वेंटी-२० संघात पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावले आणि अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला. रॉबिन उथप्पानं पदार्पणाच्या डावात हा पराक्रम केला होता.

वाढदिवसाला पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. यापूर्वी भारताकडून गुरशरण सिंग यांनी १९९०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वाढदिवसाला वन डे संघात पदार्पण केले होते.

शिखरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा करताना वन डे क्रिकेटमध्येही ६ हजार धावा पूर्ण केल्या. भारताकडून अशी कामगिरी करणारा तो पाचवा सलामीवीर आणि १०वा फलंदाज ठरला.

वन डे क्रिकेटमध्ये वाढदिवसाला अर्धशतक झळकावणारे भारतीय ( Indians scoring a fifty on their birthday (in men's ODIs) - विनोद कांबळी ( २१वा), नवज्योत सिधू ( ३१वा), सचिन तेंडूलकर ( २५वा), युसूफ पठाण ( २६ वा), इशान किशन ( २३वा)

कर्णधारपदाच्या पदार्पणात अर्धशतक झळकावणारा शिखर धवन हा सहावा भारतीय खेळाडू ठरला. अजित वाडेकर, रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर, अजय जडेजा, महेंद्रसिंग धोनी यांनी असा पराक्रम केला आहे. फक्त सचिन तेंडुलकरलाच पदार्पणाच्या डावात भारतीय कर्णधार म्हणून शतक झळकावता आले आहे. शिखर धवननं ७० धावांचा पल्ला ओलांडून १९७४ साली अजित वाडेकर ( ६७ वि. इंग्लंड) यांचा विक्रम मोडला.