IND vs NZ : भारत-न्यूझीलंड पहिल्या वनडेतील 'सुपर सिक्स' परफॉर्मर!

भारताच्या 347 धावांच्या प्रत्युत्तरात किवी फलंदाजांनी सुरेख खेळ केला. या विजयासह न्यूझीलंडनं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल या भारतीय सलामीवीरांनी साजेशी सुरुवात केली. दोघांनी आठ षटकांत अर्धशतकीय भागीदारी केली. कर्णधार विराट कोहलीनं 63 चेंडूंत 6 चौकारांसह 51 धावा केल्या.

वन डे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावत श्रेयसनं आजचा सामना गाजवला. श्रेयसनं 107 चेंडूंत 11 चौकार व 1 षटकार खेचून 103 धावा केल्या. त्यानं विराट व लोकेश यांच्यासह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केल्या.

अखेरच्या षटकांत लोकेश राहुलनं सामन्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. लोकेश 64 चेंडूंत 3 चौकार व 6 षटकारांसह 88 धावांवर नाबाद राहिला.

लक्ष्याचा पाठलाग करताना मार्टीन गुप्तील आणि हेन्री निकोल्स यांनी सावध सुरुवात करताना संघाला पहिल्या दहा षटकांत बिनबाद 54 धावा केल्या. गुप्तील माघारी परतल्यानंतर निकोल्सनं 82 चेंडूंत 11 चौकारांसह 78 धावा केल्या.

त्यानंतर प्रभारी कर्णधार टॉम लॅथम आणि अनुभवी फलंदाज रॉस टेलर यांनी किवींना विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. टॉमनं 48 चेंडूंत 8 चौकार व 2 षटकार खेचून 69 धावा केल्या.

या सामन्याचा नायक ठरला तो रॉस टेलर. त्यानं अखेरपर्यंत संयमी खेळ करताना किवींची विजय पक्का केला. रॉसनं 84 चेंडूंत नाबाद 109 धावांची खेळी साकारताना 10 चौकार व 4 षटकार खेचले.