India vs Australia, 3rd Test : अजिंक्य रहाणेचा गेम प्लान ठरला; रोहितसह तीन खेळाडूंना तिसऱ्या कसोटीत देणार संधी

India vs Australia : अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियानं मेलबर्न कसोटीत इतिहास रचला. ०-१ अशा पिछाडीनंतर टीम इंडियाला एकमागून एक धक्के बसले. विराट कोहली मायदेशी परतला, मोहम्मद शमीनं दुखापतीमुळे माघार घेतली आणि सामन्याच्या दुसऱ्या डावात उमेश यादव जायबंदी झाला. तरीही अजिंक्य खचला नाही आणि त्यानं शतकी खेळीसह कल्पक नेतृत्व करताना ऑस्ट्रेलियाला हार मानण्यास भाग पाडले.

पहिल्या डावात ११२ धावांची खेळी करणाऱ्या अजिंक्यला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देण्यात आला. त्याचा 'Mullagh Medal' नं सन्मान करण्यात आला आणि हे पदक जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. मेलबर्नवर शतकी खेळी करणाऱ्या अजिंक्यनं पुन्हा एकदा त्याचे नाव MCGच्या मानाच्या फलकावर झळकावले.

तिसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियानंही संघात बदल करताना जो बर्न्सला डच्चू दिला. ऑस्ट्रेलियाच्या संघात डेव्हिड वॉर्नर आणि सीन अॅबोट यांचे पुनरागमन झाले, तर विल पुकोव्हस्कीला पदार्पणाची संधी मिळणार आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा कसोटी सामना ७ ते ११ जानेवारीला सिडनीत खेळवला जाईल. त्यानंतर १५ ते १९ जानेवारीला चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे होईल. कर्णधार अजिंक्यनंही तिसऱ्या सामन्यासाठी डावपेच आखले आहेत आणि तो अंतिम ११मध्ये तीन बदल करण्याच्या तयारीत आहे.

भारतीय संघानं मेलबर्नवर खेळवलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत ८ विकेट राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांत गुंडाळल्यानंतर अजिंक्य रहाणेचे शतक व रवींद्र जडेजाच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियानं ३२६ धावा करून १३१ धावांची आघाडी घेतली.

भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ २०० धावांवर माघारी पाठवून टीम इंडियांच्या विजयाचा पाया त्यांनी रचला. भारतान ७० धावांचे माफक लक्ष्य सहज पार केले. पण, उमेश यादवच्या दुखापतीनं टीम इंडियाचं टेंशन वाढवलं आहे.

तिसऱ्या कसोटीसाठी आठ दिवसांचा कालावधी आहे आणि तोपर्यंत उमेश तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुासर उमेश तिसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे त्याच्या जागी नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर यांची नावं चर्चेत आहेत. पण, टी नटराजनला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

रोहित शर्मानेही क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे आणि त्यानं आजपासून संघासोबत सरावालाही सुरुवात केली आहे. त्याच्या तंदुरुस्तीची पाहणी केल्यानंतरच त्याच्या खेळण्यावर योग्य निर्णय घेतला जाईल. रोहित शर्माचे खेळण्याची शक्यताही अधिक आहे.

लोकेश राहुलचा संघात समावेश आहे, परंतु त्याला अंतिम ११मध्ये खेळण्याची संधी कधी मिळेल, हा सवाल प्रत्येक जण करतोय. हनुमा विहारीच्या अपयशानं लोकेश राहुलच्या अंतिम ११मधील मार्ग मोकळा झाला आहे.

तिसऱ्या कसोटीत मयांक अग्रवाल, हनुमा व उमेश ( दुखापतग्रस्त) यांच्या जागी रोहित शर्मा, लोकेश राहुल व टी नटराजन यांच्यासह अजिंक्य रहाणे अंतिम ११ खेळाडू घेऊन मैदानावर उतरणार आहे.

टीम इंडियाचे संभाव्य Playing XI - रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, टी नटराजन