India Tour of Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यासाठी हार्दिक पांड्याचा कर्णधार म्हणून विचार न केल्यानं प्रशिक्षक नाराज, केलं मोठं विधान

India Tour of Sri Lanka : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर असताना बीसीसीआयनं श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा दुसरा संघ जाहीर केला अन् त्याचे नेतृत्व अनुभवी सलामीवीर शिखर धवन ( Shikhar Dhawan) याच्या खांद्यावर सोपवले.

India Tour of Sri Lanka : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर असताना बीसीसीआयनं श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा दुसरा संघ जाहीर केला अन् त्याचे नेतृत्व अनुभवी सलामीवीर शिखर धवन ( Shikhar Dhawan) याच्या खांद्यावर सोपवले. महान फलंदाज राहुल द्रविड ( Rahil Dravid) याच्याकडे मुख्य प्रशिक्षकपद दिले गेले आहे.

या दौऱ्यावर देवदत्त पडिक्कल, चेतन सकारीया, ऋतुराज गायकवाड या नव्या चेहऱ्यांना आपली छाप पाडण्याची संधी आहे, तर हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार ( उप कर्णधार), शिखर धवन या अनुभवी खेळाडूंना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी दावेदारी सांगण्याची संधी आहे.

पण, या दौऱ्यासाठी निवडलेल्या संघाचे नेतृत्व कोणाकडे सोपवावे, यासाठी हार्दिक पांड्याच्या नावाचा विचार न झाल्यानं त्याचे प्रशिक्षक जितेंद्र सिंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे. Cricketnextशी बोलताना त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले. तसेच त्यांनी हार्दिक हा यशस्वी कसोटीपटू बनू शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हार्दिकनं ११ कसोटीत ३१.२९च्या सरासरीनं ५३२ धावा केल्या आहेत आणि त्यात एक शतक व ४ अर्धशतकांचा समावेश आहे. ''कसोटी संघातही तो योगदान देऊ शकतो. त्याच्याकडे तसे तंत्रशुद्ध फलंदाजीची शैली आहे आणि संधी मिळाल्यास तो आणखी परिपक्व बनू शकतो. त्याच्यासाठी खेळपट्टी, वातावरण हे दुय्यम आहे,''असे जितेंद्र यांनी सांगितले.

श्रीलंका दौऱ्यासाठी कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याच्या नावाचा विचार न केल्यामुळे जितेंद्र नाराज झाले. ''त्याच्या नावाचा विचार व्हायला हवा होता. तो पाच ते सात वर्ष क्रिकेट खेळतोय आणि तो योग्य पर्याय ठरला असता. त्याच्याकडे काही नवीन कल्पना आहेत आणि प्रचंड ऊर्जा आहे. कर्णधार म्हणून त्याच्यावरील गुंतवणूक वाया गेली नसती, विशेषतः मर्यादित षटकांच्या मालिकेत,''असे ते म्हणाले.

Read in English