IND vs ENG, 2nd Test : आर अश्विननं मोडला MS Dhoniचा विक्रम, चेन्नई कसोटी गाजवत नोंदवले अनेक पराक्रम!

R Ashwin break MS Dhoni record कोरोना व्हायरसच्या संकटानंतर प्रथमच प्रेक्षकांसमोर झालेल्या सामन्यात टीम इंडियानं कमाल करून दाखवली. आर अश्विननं ( R Ashwin) घरच्या मैदानावर कसोटी शतक झळकावताना इंग्लंडच्या गोलंदाजांना हतबल केलं. त्याचं हे कसोटी क्रिकेटमधील पाचवे शतक ठरलं.

अश्विन व मोहम्मद सिराज यांनी १०व्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. अश्विन १४८ चेंडूंत १४ चौकार व १ षटकारासह १०६ धावांवर माघारी परतला. भारतानं इंग्लंडसमोर ४८२ धावांचे लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात इंग्लंडचा दुसरा डावही गडगडला. तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचे तीन फलंदाज अवघ्या ५३ धावांवर माघारी परतले होते. ही कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाला आता फक्त ७ विकेट्स घ्यायच्या आहेत.

विराट कोहली आणि आर अश्विन या दोघांनी सातव्या विकेटसाठी १७७ चेंडूंत ९६ धावांची भागीदारी केली. विराट ६२ धावांवर ( १४९ चेंडू व ७ चौकार) माघारी परतला. चेपॉकवर सातव्या विकेटसाठी भारतीय जोडीनं केलेली ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी, करुण नायर व रवींद्र जडेजा यांनी २०१६मध्ये इंग्लंडविरुद्ध १३८ धावा आणि मोहम्मद कैफ व पार्थिव पटेल यांनी २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०४ धावांची भागीदारी केली होती.

टीम इंडियाकडून ८ किंवा त्याच्या खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना कसोटीत सर्वाधिक अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये अश्विननं ( ६) हरभजन सिंगला ( ५ अर्धशतकं) मागे टाकले. कपिल देव ८ अर्धशतकांसह अव्वल स्थानावर आहेत. रवींद्र जडेजा व सय्यद किरमानी यांच्या खात्यातही प्रत्येकी ५-५ अर्धशतकं आहेत.

आर अश्विन इंग्लंडविरुद्ध १०००+ धावा आणि १०० विकेट्स घेणारा सातवा खेळाडू ठरला. यापूर्वी जॉर्ज गिफन ( ऑस्ट्रेलिया), माँटी नोबल ( ऑस्ट्रेलिया), गॅरी सोबर्स ( वेस्ट इंडिज) , रिचर्ड हॅडली ( न्यूझीलंड), कपिल देव ( भारत), शेन वॉर्न ( ऑस्ट्रेलिया), शॉन पोलॉक ( दक्षिण आफ्रिका) यांनी अशी कामगिरी केली आहे. कपिल देव यांच्यानंतर इंग्लंडविरुद्ध १००० धावा व १०० विकेट्स घेणारा अश्विन हा पहिलाच भारतीय आहे. कपिल देव यांनी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्धही अशी कामगिरी केली आहे.

चेपॉकवर एकाच कसोटीत पाच विकेट्स व अर्धशतक करणारा आर अश्विन तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी १९८०मध्ये कपिल देव यांनी पाकिस्तानविरुद्ध आणि २०१६मध्ये रवींद्र जडेजानं इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती

एकाच कसोटीत शतक व पाच विकेट्स असा पराक्रम तिसऱ्यांदा केला. इयान बॉथम यांनी पाचवेळा असा पराक्रम केला आहे. गॅरी सोबर्स, एम मोहम्मद, जॅक कॅलिस, शकिब अल हसन यांनी प्रत्येकी दोन वेळा असा पराक्रम केला आहे. भारताकडून विनू मंकड ( वि. इंग्लंड १९५२), पॉली उम्रीगर ( वि. वेस्ट इंडिज १९६२) यांनी असा पराक्रम केला आहे. अश्विननं १०३ धावा व ५-१५६ ( वि. वेस्ट इंडिज, २०११), ११३ धावा व ७-८३ ( वि. वेस्ट इंडिज, २०१६) आणि १०३* व ५-४३ ( वि. इंग्लंड, २०२१) यांच्याविरुद्ध हा पराक्रम करून दाखवला.

कसोटी क्रिकेटमध्ये आठव्या क्रमांकावर सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये आर अश्विननं ( ३ शतकं) पाकिस्तानच्या कामरान अकमल याच्याशी बरोबरी केली. न्यूझीलंडचा डॅनिएल व्हिटोरी ४ शतकांसह अव्वल स्थानी आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये ३००+विकेट्स अन् पाच किंवा त्यापेक्षा अधिक शतकं नावावर असलेल्या फलंदाजांमध्ये आर अश्विन पाचव्या क्रमांकावर आहे. इयान बॉथम ( ३८३ विकेट्स व १४ शतकं), कपिल देव ( ४३४ विकेट्स व ८ शतकं), डॅनिएल व्हिटोरी ( ३६२ विकेट्स व ६ शतकं), इम्रान खान ( ३६२ विकेट्स व ६ शतकं), आर अश्विन ( ३९१* विकेट्स व ५ शतकं) असा हा क्रम येतो.

भारताकडून ८व्या क्रमांकावर सर्वाधिक ३ शतकांचा विक्रम अश्विनच्या नावावर नोंदवला गेला. त्यानं कपिल देव, महेंद्रसिंग धोनी व हरभजन सिंग यांचा दोन शतकांचा विक्रम मोडला.