India vs Australia, 4th Test : 'वॉशिंग्टन' नावामागची हृदयस्पर्शी कथा; जाणून पाणावतील डोळे!

- स्वदेश घाणेकर : ब्रिस्बेन कसोटीचा तिसरा दिवस लक्षात राहिल तो वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांच्या फटकेबाजीमुळे.... भारताचे आघाडीचे सहा फलंदाज १८६ धावांवर माघारी परतले होते आणि हाताशी होते ते नव्या दमाचे खेळाडू. ज्यांचा कसोटीचा एकूण अनुभव हा फक्त चार सामन्यांचा... पण, गॅबा कसोटीच्या तिसऱ्या दिवशी चमक्तार घडला आणि टीम इंडियानं जबरदस्त कमबॅक केलं.

पहिलीच कसोटी खेळणाऱ्या वॉशिंग्टननं सुरुवातीला तीन विकेट्स घेऊन कमाल केलीच होती आणि त्याची फलंदाजी पाहण्यासाठी सारेच उत्सुक होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एक खणखणीत शतक ( १५९ धावा) जमा होतेच. पण, ऑस्ट्रेलियाच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजांसमोर त्याचा निभाव लागणे थोडे अवघडच होते.

७व्या क्रमांकावर आलेल्या वॉशिंग्टननं जिद्दीनं खेळ केला आणि शार्दूल ठाकूरसह ( Shardul Thakur) विक्रमी कामगिरी करून दाखवली. या जोडीनं खेळपट्टीवर नांगर रोवला नाही, तर धावांचा पाऊसही पाडला. ३६ षटकं या दोघांनी खेळली आणि १२३ धावांची विक्रमी भागीदारी केली. त्यामुळेच ६ बाद १८६ धावांवरून टीम इंडियानं ३३६ धावांपर्यंत मजल मारली.

ब्रिस्बेनवर भारतासाठी सातव्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारीचा विक्रमही नावावर केला. या दोघांनी ५९ धावा करताच १९९१चा कपिल देव व मनोज प्रभाकर यांचा विक्रम मोडला. कपिल देव - मनोद प्रभाकर यांनी ५८ धावांची भागीदारी केली होती.

वॉशिंग्टन सुंदरनं पदार्पणात सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ६२ धावा करताना ऑस्ट्रेलियात पदार्पणात १९११नंतरची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली. ११० वर्षांपूर्वी इंग्लंडच्या फ्रँक फोस्टर यांनी ५६ धावा चोपल्या होत्या. गॅबा कसोटीत पदार्पणात १०० चेंडूंचा सामना करणारा सुंदर हा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला.

वॉशिंग्टन १४४ चेंडूंत ७ चौकार व १ षटकार खेचून ६२ धावांवर बाद झाला. शार्दूलने ११५ चेंडूंत ९ चौकार व २ षटकार मारून ६७ धावा केल्या. कसोटी पदार्पणात अर्धशतक व तीन विकेट्स घेणारा सुंदर हा दहावा खेळाडू ठरला, तर १९४७नंतर दत्तू फडकर ( वि. ऑस्ट्रेलिया) यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. या कामगिरीनंतर सोशल मीडियावर सुरू झाला वॉशिंग्टन नावाचा ट्रेंड...

वॉशिंग्टन हे नाव असू शकतं आणि तेही एका भारतीयाचे... यावर अजूनही विश्वास बसणे थोडेसे अवघडच आहे. पण, त्यामागे एक हृदयस्पर्शी कथा आहे. दिवंगत आर्मी ऑफिसरचं नाव वॉशिंग्टनला देण्यात आले आणि त्याला कारणही तसेच खास आहे.

५ नोव्हेंबर १९९९ मध्ये चेन्नईत वॉशिंग्टनचा जन्म झाला. त्याचे वडील एम सुंदर यांनाही क्रिकेटची आवड, परंतु गरीब घरात जन्मलेल्या एम सुंदर यांना त्यांची आवड जपताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. त्यावेळी त्यांच्या घरापासून जवळच निवृत्ती आर्मी अधिकारी पी डी वॉशिंग्टन रहायचे आणि त्यांनी एम सुंदर यांना क्रिकेटपटू बनण्यासाठी मदत केली.

एम सुंदर सांगतात,''वॉशिंग्टन हे क्रिकेटचे चाहते होते आणि मरीना ग्राऊंडवर क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी ते यायचे. त्यांना माझा खेळ आवडला. माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती आणि वॉशिंग्टन यांनी माझ्यासाठी युनिफॉर्म खरेदी केला, त्यांनी माझ्या शाळेची फी भरली, पुस्तकं खरेदी करून दिली. ते मला त्यांच्या सायकलवरून मैदानापर्यंत न्यायचे आणि सतत मला प्रेरणा द्यायचे.''

एम सुंदर यांनी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनकडून प्रथम विभागीय लीगमध्ये खेळण्यास सुरुवात केली आणि या यशामागे वॉशिंग्टन यांचा मोठा वाटा होता. वॉशिंग्टन यांची आठवण म्हणून एम सुंदर यांनी मुलाला त्यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला होता. १९९९मध्ये पी डी वॉशिंग्टन यांचे निधन झाले आणि काही महिन्यानंतर एम सुंदर यांच्या घरी मुलानं जन्म घेतला. तेव्हा त्यांनी मुलाचं वॉशिंग्टन असं नाव ठेवलं.

Read in English