मोहम्मद सिराजनं मोडला १८ वर्षांपूर्वीचा विक्रम; जसप्रीत बुमराहची जादूची झप्पी, Video

India vs Australia, 4th Test Day 4 : संकटावर मात करून मोहम्मद सिराजनं ( Mohammed Siraj) हा ऑस्ट्रेलिया दौरा संस्मरणीय बनवला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दाखल होताच मायदेशातून वडिलांच्या निधनाची बातमी आली. त्याही परिस्थितीत त्यानं मन घट्ट करून संघासोबत राहण्याचा निर्णय घेतला.

मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्यानंतर सिराजला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. त्यात चौथ्या कसोटीपूर्वी जसप्रीत बुमराह व आर अश्विन हे अनुभवी गोलंदाज जायबंदी झाले आणि दोन कसोटींचा अनुभव असलेल्या सिराजकडे जलदगती गोलंदाजाचे नेतृत्व सांभाळण्याची जबाबदारी आली. त्यातही न खचता त्यानं दमदार कामगिरी केली. दुसऱ्या डावात त्यानं पाच विकेट्स घेत कमालच केली.

ब्रिस्बेन कसोटीत चौथ्या डावात फलंदाजी करणं सोपं नाही, याची प्रचिती चौथ्या दिवसाचा खेळ पाहताना आली. अनपेक्षित उसळी घेणाऱ्या चेंडूंचा सामना करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा कस लागला. तरीही त्यांनी टीम इंडियासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे करण्यात यश मिळवले.

मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) आणि शार्दूल ठाकूर ( Shradul Thakur) यांनी मदत करणाऱ्या खेळपट्टीवर दबदबा गाजवताना ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. मोहम्मद सिराजनं ७३ धावांत ५ विकेट्स घेतल्या, तर शार्दूलनं ६१ धावांत ४ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर गडगडला आणि टीम इंडियाला आता विजयासाठी ३२८ धावा कराव्या लागतील.

चौथ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला चार धक्के दिले. शार्दूल व वॉशिंग्टन यांनी सलामीवीरांना माघारी पाठवल्यानंतर मोहम्मद सिराजनं एकाच षटकात दोन फलंदाज बाद केले.

स्टीव्ह स्मिथनं आक्रमक खेळ करताना अर्धशतक पूर्ण केलं. तत्पूर्वी वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर सिराजनं स्मिथचा झेल सोडला. पण, याची भरपाई त्यानं केली. अप्रतिम चेंडू टाकून स्मिथला त्यानं माघारी जाण्यास भाग पाडले. अनपेक्षित उसळी घेणारा चेंडू स्मिथच्या अंगठ्याला लागला आणि अजिंक्यनं तो झेल टिपला. त्याला ५५ धावांवर माघारी जावे लागले.

यानंतर शार्दूल ठाकूरनं ऑसींना धक्का दिला. कॅमेरून ग्रीन ( ३७) ठाकूरच्या गोलंदाजीवर रोहित शर्माच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ काही काळ थांबला होता. त्यानंतर शार्दूल व सिराज यांनी ऑसींना धक्का देण्याचे सत्र कायम ठेवले. पॅट कमिन्स एकाबाजूनं फटकेबाजी करत ऑसींची आघाडी वाढवत होता आणि त्यानं नाबाद २८ धावा केल्या.

३२ वर्षांत ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्यांदा गॅबा कसोटीत दोन्ही डावांत सर्वबाद झाला. ब्रिस्बेन कसोटीत २००३नंतर भारतीय गोलंदाजाला प्रथमच पाच विकेट्स घेता आल्या आहेत. २००३मध्ये झहीर खाननं ही कामगिरी केली होती.

गॅबा कसोटीत भारतीय गोलंदाजानं केलेली ही चौथी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. १९६८मध्ये इरापल्ली प्रसन्ना यांनी १०४ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर बिशनसिंग बेदी ( ५-५५, १९७७), मदन लाल ( ५-७२, १९७७) यांनी हा पराक्रम केला होता. मोहम्मद सिराजनं आज ७३ धावांत ५ विकेस्ट घेऊन झहीर खानचा २००३ सालचा ( ५-९५) विक्रम मोडला.

आतापर्यंत तीन कसोटीत मोहम्मद सिराजनं १३ विकेट्स नावावर केल्या आहेत आणि या मालिकेत प्रथमच भारतीय गोलंदाजानं एका डावात पाच विकेट्स घेतल्या. या मालिकेत भारताकडून सर्वाधिक विकेटचा विक्रमही सिराजच्या नावावर झाला आहे. पहिल्याच मालिकेत सर्वाधिक १३ विकेट्स घेण्याचा भारतीय गोलंदाजाचा विक्रम सिराजनं नावावर केला. त्यानं जवागल श्रीनाथचा ( १९९१-९२) चा १० विकेट्सचा विक्रम मोडला. श्रीनाथच्या नावावर ५५१ आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत.