मित्रानं वाचवलं नसतं, तर जीव गेलाच होता; विराट कोहलीनं सांगितला थरारक प्रसंग

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं सोमवारी आपल्या आयुष्यातील एक थरारक प्रसंग सांगितला. मित्रानं वाचवलं नसतं, तर जीव गेलाच होता, असं कोहलीनं सांगितलं.

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याच्यासह इंस्टाग्राम लाईव्ह चॅट दरम्यान कोहलीनं हा प्रसंग सांगितला. यावेळी कोहली व छेत्री यांनी अनेक गोष्टींवर गप्पा मारल्या.

यावेळी छेत्रीनं कॅप्टन कोहलीला स्वतःच्या बायोपिकमध्ये काम करशील का, असे विचारले त्यावेळी त्यानं अनुष्का शर्मा माझ्या पत्नीची भूमिका करत असेल, तर मी काम करण्यास तयार आहे, असे सांगितले.

याशिवाय राज्य संघात निवड होण्यासाठी वडिलांकडे लाच मागितल्याचा खुलसाही त्यानं केला. तो म्हणाला,''राज्य क्रिकेटकडून एक व्यक्ती वडिलांकडे आली आणि संघात निवड होण्यासाठी काही त्रास तर होन नाही ना असं विचारलं.''

कोहली म्हणाला,''ती व्यक्ती नक्की काय बोलतेय, हे वडिलांना कळलं नाही. पण, ती त्यांच्याकडे लाच मागत होती.''

कोहलीचे वडील वकील होते आणि त्यांनी त्यास नकार दिला. माझा मुलगा त्याच्या दमावर संघात स्थान पटकावेल, असं तेव्हा त्यांनी त्या व्यक्तीला खडसावलं होतं.

कोहलीनं लहानपणीचा एक किस्सा सांगितला. पंतग उडवण्यासाठी तो घराच्या छतावर चढला होता आणि तेव्हा मित्रानं वाचवल्याचं, कोहलीनं सांगितले.

त्यानं सांगितले,''लहानपणी आम्ही सर्व मित्र मिळून घराच्या छतावर पतंग उडवायचो.''

''15 ऑगस्टच्या आसपासचा तो दिवस होता. आम्ही सर्व मित्र पतंग उडवत होतो, तेव्हा मित्रांनी मला पतंग पकडण्यास सांगितले,''असे कोहली म्हणाला.

कोहलीनं पुढे सांगितले की,''आमच्या सोसायटीमधील घरांची छतं एकमेकांना लागून होती. पतंग पकडताना मी छतावरून पडणारच होतो, परंतु माझ्या मित्रानं वाचवले. छतावरून पडलो असतो तर जीवच गेला असता.''