दुखापतीमुळे नव्हे, तर 'या' कारणामुळे हार्दिक पांड्याची न्यूझीलंड दौऱ्यातून माघार!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) रविवारी न्यूझीलंड दौऱ्यातील ट्वेंटी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. हार्दिक पांड्याला या संघात स्थान देण्यात आले नाही.

राष्ट्रीय संघापूर्वी हार्दिक भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करणार होता, परंतु त्याने भारत अ संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यातूनही माघार घेतली. पण, हार्दिकनं सोमवारी टीम इंडियासोबत नेट्समध्ये कसून सराव केला.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तंदुरुस्तीच्या कारणावरून नव्हे, तर हार्दिकनं एका कारणासाठी न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घेतली.

हार्दिक टीम इंडियाचे गोलंदाज प्रशिक्षक भरत अरूण यांच्यासोबत तंदुरुस्तीसाठी वारंवार चर्चा करत आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी IANS ला सांगितले की,''हार्दिक स्वतः तंदुरुस्तीवर समाधानी नव्हता. त्यानं दुखापतीवर आणखी काम करण्याची गरज असल्याची इच्छा व्यक्त केली. दोन ते तीन तास हार्दिकच्या तंदुरुस्तीची चाचणी घेण्यात आली होती. या कालावधीत त्यानं गोलंदाजी केली. त्यात तो स्वतः समाधानी नाही झाला. त्यामुळे त्यानं दौऱ्यातून माघार घेतली.''

सूत्रांनी पुढे सांगितले की,''हार्दिक झोपेतही यो-यो चाचणी पास करू शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून कमबॅक करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. तोपर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होण्याचा त्याचा निर्धार आहे. अर्धवट उपचार घेऊन त्याला मैदानावर परतायचे नव्हते.''

दरम्यान हार्दिकनं न्यूझीलंड दौऱ्याच्या मध्यंतरापर्यंत कमबॅक करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. तो म्हणाला,''न्यूझीलंड मालिकेच्या मध्यंतरापर्यंत मी कमबॅक करेन. काही आंतरराष्ट्रीय सामने, आयपीएल आणि त्यानंतर ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, हा माझा प्लान आहे. माझ्यासाठी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप हा महत्त्वाचा आहे.

न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघ पाच ट्वेंटी-20 सामन्यांसह तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. पण, या दौऱ्यावर हार्दिक कमबॅक करेल, याची शक्यता फार कमी आहे.